उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद जागा शरद पवार गटाला? महाविकास आघाडीत सकारात्मक चर्चेला वेग

यशश्री अपडेट्स -धाराशिव(प्रतिनिधी ): उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संदर्भात आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये प्राथमिक स्तरावर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.

या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्या, जिल्हानिहाय राजकीय ताकद आणि विद्यमान समीकरणे लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा दावा मजबूत मानला जात आहे. विशेषतः उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे सदस्य संख्याबळ निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाकडूनही या जागेवर दावा करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र महाविकास आघाडीत समन्वय राखण्यासाठी आणि राज्यातील इतर विधान परिषद जागांवरील राजकीय समीकरणांचा विचार करून काँग्रेसकडून या जागेबाबत मवाळ भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील अन्य ठिकाणी काँग्रेसकडून उमेदवारीवर अधिक भर दिला जाणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

यामुळे आता महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या नावाची चर्चा अधिक जोर धरू लागली आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. उमेदवार निवडताना स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद, पक्षनिष्ठा आणि तीनही जिल्ह्यांतील स्वीकारार्हता या बाबींना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, महायुतीकडून कोणता उमेदवार मैदानात उतरवला जाणार याबाबतही उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्येच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *