महामार्गावरील धावत्या टेम्पोवरील मालचोरीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी जेरबंद, १.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त


यशश्री अपडेट्स : धाराशिव (प्रतिनिधी)
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर धावत्या आयशर टेम्पोवर चढून ताडपत्री फाडत आतील माल चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला १ लाख २३ हजार ३९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २१ जून २०२६ रोजी येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या आयशर टेम्पोवर अज्ञात चोरट्यांनी चढून ताडपत्री फाडत आतील माल चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी तात्काळ गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना दिले होते.
त्यानुसार, दि. २२ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संतोष राजेंद्र शिंदे (वय २२, रा. लक्ष्मी पारधी पेढी, तेरखेडा) यास शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या इतर साथीदारांसह सदर चोरी केल्याची कबुली दिली.
पोलीसांनी आरोपीकडून चोरीस गेलेल्या ओकस्मिथ व्हिस्कीच्या ९ बॉक्ससह एकूण १ लाख २३ हजार ३९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त मुद्देमालाचा पंचनामा करून तो ताब्यात घेण्यात आला असून अटक आरोपीस पुढील कारवाईसाठी येरमाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच, त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे तसेच शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, प्रदीप वाघमारे, फरहान पठाण, शोभा बांगर, रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव व रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

error: Content is protected !!