बरखास्त! शिवसेना कार्यकारिणी बरखास्त; खासदार ओमराजेंच्या पक्षप्रवेशानंतर मोठी घडामोड


यशश्री अपडेट्स : धाराशिव (प्रतिनिधी)
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाची सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशानंतर जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव संजय मोरे यांनी जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत सर्व संघटनांच्या कार्यकारिणींचा समावेश आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी प्रभारी जिल्हाध्यक्ष अजित पिंगळे यांनी धाराशिव शहरातील काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. या नियुक्त्यांनंतर पक्षांतर्गत काहीसा गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
अजित पिंगळे आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यातील संबंधांबाबतही अनेक वेळा शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली होती. जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेचे एबी फॉर्म तसेच उमेदवारांची निवड ही आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मर्जीनुसार करण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला होता.
आता पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!