निधी वाटपावरून जिल्हा परिषदेत वादाची ठिणगी; स्थानिक मागणीनुसार कामे घ्या – शिवसेना सदस्य आक्रमक

यशश्री अपडेट्स : धाराशिव (प्रतिनिधी)

धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत १५ व्या वित्त आयोगाच्या विकास निधीचे वाटप सर्व जिल्हा परिषद गटांना समानतेने व स्थानिक गरजेनुसार करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) जिल्हा परिषद सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निधी वाटपातील कथित असमानता आणि मनमानी कारभाराविरोधात सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आवाज उठवला आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत १५ व्या वित्त आयोगाच्या १० टक्के विकास निधीतून काही निवडक गावे व विशिष्ट जिल्हा परिषद गटांमध्येच शौचालय बांधकाम व अभ्यासिका उभारणीसाठी निधी खर्च करण्याचा निर्णय झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हा निर्णय नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाला धरून नसल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, १५ व्या वित्त आयोगाचा निधी हा संपूर्ण जिल्ह्यासाठी प्राप्त होतो. त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद गटाला लोकसंख्या व क्षेत्रफळाचा विचार करून समतोल पद्धतीने निधीचे वाटप होणे अपेक्षित आहे. केवळ काही गटांमध्येच निधी केंद्रित केल्यास इतर भागांच्या विकासावर अन्याय होणार असल्याची भूमिका सदस्यांनी मांडली.

गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेत प्रशासक राजवट असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींना जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविता आल्या नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक ग्रामीण भागांतील विकासकामे प्रलंबित असून, प्रत्येक गटाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. कुठे रस्ते, कुठे पिण्याच्या पाण्याची तर कुठे आरोग्य सुविधांची गरज असल्याने केवळ शौचालय किंवा अभ्यासिका यांसारख्या मर्यादित कामांसाठीच निधी खर्च करणे योग्य नसल्याचे सदस्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक जिल्हा परिषद गटातील स्थानिक लोकप्रतिनिधींकडून विकासकामांचे प्रस्ताव मागवून त्यानुसार निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच सर्वसाधारण सभेतील संबंधित ठरावाचा पुनर्विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शिफारसींना प्राधान्य दिल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण व समतोल विकास साधता येईल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांच्यासह सीमा भैरवनाथ माडजे, सविता विकास तळेकर, अश्विनी उंदरे, विजयमाला मारकड, जयश्री बालाजी काळे, साधना बापूसाहेब अंधारे, वैशाली चंद्रकांत डोके, अमर सुभाष मोरे, अजित भागवत लाकाळ आणि सुवर्णा सतीश पाटील यांच्या सह्या निवेदनावर आहेत. निवेदनाची प्रत आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनाही देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *