यशश्री अपडेट्स : धाराशिव (प्रतिनिधी)
धाराशिव तहसील प्रशासनाने अवैध गौण खनिज साठवणुकीविरोधात कठोर कारवाई करत मौजे दाऊतपूर येथील गट क्रमांक १५८ मधील सुमारे २० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी सौरभ राजकुमार शिंदे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ अंतर्गत दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून त्यांना तब्बल ₹८.७३ लाखांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.
तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ११ जून २०२६ रोजी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी जागजी, ग्राम महसूल अधिकारी इर्ला तसेच दारफळ व दाऊतपूर येथील पोलीस पाटील यांच्या संयुक्त पथकाने दाऊतपूर परिसरात अचानक पाहणी केली. यावेळी गट क्रमांक १५८ मध्ये नवीन विहिरीचे खोदकाम सुरू असल्याचे आढळून आले. विहिरीलगत अंदाजे २० ब्रास वाळूचा साठा करण्यात आल्याचेही निदर्शनास आले.
तपासणीदरम्यान संबंधित सौरभ शिंदे यांच्याकडे वाळू उत्खनन, वाहतूक अथवा साठवणुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही वैध परवानगी, वाहतूक पास किंवा रॉयल्टी पावती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सदर वाळू शासनाच्या वतीने जप्त करण्यात आली असून तिचा ताबा दाऊतपूरचे पोलीस पाटील सचिन भागवत जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
मंडळ अधिकारी जागजी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, संबंधितांनी अवैधरित्या वाळू उत्खनन करून ती बिनपरवानगी साठवून ठेवली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम ४८ (७) व (८) अन्वये दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव तहसील प्रशासनाने तयार केला आहे.
सन २०२६-२७ च्या बाजारभावानुसार २० ब्रास वाळूसाठी ₹७,१६,००० इतका पाचपट दंड, ₹१४,३२६ जिल्हा खनिज निधी तसेच इतर शुल्कांसह एकूण ₹८,७३,५८६ इतका दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.
तहसीलदारांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये सौरभ शिंदे यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत तहसील कार्यालयात उपस्थित राहून खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीत खुलासा सादर न केल्यास प्रस्तावित दंड मान्य असल्याचे गृहीत धरून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
