स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : सोलर व पवनचक्की प्रकल्पातील तांब्याच्या तारा चोरी प्रकरण उघड; 10 गुन्हे उघडकीस, दोन आरोपी ताब्यात

यशश्री अपडेट्स | धाराशिव प्रतिनिधी:
धाराशिव जिल्ह्यातील सोलर प्लांट आणि पवनचक्की प्रकल्पांमधून तांब्याच्या केबल्स व वायर चोरीच्या वाढत्या घटनांना अखेर स्थानिक गुन्हे शाखेने मोठा आळा घालत धडाकेबाज कारवाई केली आहे. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल 10 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच 195 किलो तांब्याच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेले टाटा सुमो वाहन असा एकूण ₹6 लाख 42 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील विविध सोलर व पवनचक्की प्रकल्पांमधून महागड्या तांब्याच्या केबल्स आणि इतर साहित्य चोरीस जात असल्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.


गोपनीय माहितीच्या आधारे सापळा:


दि. 7 जून 2026 रोजी सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार येडशी परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी दोन संशयितांना टाटा सुमो वाहनासह शेत परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने तेरखेडा, रुईभर, कडगाव, डोकी, साबळेवाडी, आरसोली (ता. भूम), गौरगाव आणि मस्सा (ता. कळंब) परिसरातील सोलर व पवनचक्की प्रकल्पांमधून तांब्याच्या तारा आणि केबल चोरी केल्याची कबुली दिली.
लाखोंचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी 195 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा तसेच चोरीसाठी वापरलेले टाटा सुमो वाहन जप्त केले. या तपासातून आतापर्यंत 10 वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लागला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शिवाजी उर्फ नाना संजय काळे (रा. खामकर पारधी पेढ, ता. वाशी, जि. धाराशिव) याचा समावेश असून दुसरा आरोपी विधीसंघर्षित बालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जप्त मुद्देमाल आणि आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.


पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक:


ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, स.पो.नि. सुदर्शन कासार, तसेच शौकत पठाण, प्रकाश आवताडे, जावेद शेख, फरहान पठाण, कोळी, रत्नदीप डोंगरे आणि नागनाथ गुरव यांच्या पथकाचा सहभाग होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या प्रभावी कारवाईमुळे जिल्ह्यातील सोलर व पवनचक्की प्रकल्पांमधील चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असून पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *