यशश्री अपडेट्स-धाराशिव(प्रतिनिधी):
लातूर-धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भावना आणि अपेक्षा व्यक्त करणारे एक खुले पत्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस निखिल हुंडेकर यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना उद्देशून हे पत्र लिहिले असून, पक्षासाठी दीर्घकाळ संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
पत्रात हुंडेकर यांनी नमूद केले आहे की, भाजपची ताकद वाढविण्यासाठी आणि पक्षाची मुळे ग्रामीण भागात रुजविण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी आयुष्य झिजवले. सत्ता, पद किंवा भविष्यातील कोणतीही खात्री नसताना केवळ विचारांवरील श्रद्धा आणि पक्षनिष्ठेच्या बळावर त्यांनी काम केले. मात्र आज पक्ष सत्तेत आल्यानंतर अशा निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात भाजप उभारणीसाठी योगदान देणाऱ्या मिलिंद पाटील, सुजितसिंह ठाकूर, दत्ता कुलकर्णी, नितीन काळे यांसारख्या कार्यकर्त्यांचा उल्लेख करत, संघर्षातून उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या त्यागाचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे.
“प्रत्येक वेळी बाहेरून आलेल्यांनाच संधी मिळणार आणि पक्षासाठी आयुष्य झिजवणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले जाणार असेल, तर भविष्यातील कार्यकर्ता पक्षासाठी त्याग करण्यास का पुढे येईल?” असा सवालही हुंडेकर यांनी उपस्थित केला आहे.
विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी देताना केवळ राजकीय गणित न पाहता पक्षासाठी संघर्ष केलेल्या आणि कार्यकर्त्यांमध्ये स्वीकारार्हता असलेल्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या खुल्या पत्रामुळे लातूर-धाराशिव-बीड विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमधील भावना पुन्हा एकदा चर्चेत आल्या असून, पक्ष नेतृत्व याची कितपत दखल घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

