धाराशिव एलसीबीचा मोठा दणका; अट्टल घरफोड्या अटकेत, ३२ गुन्ह्यांचा उलगडा, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

यशश्री अपडेट्स-धाराशिव(प्रतिनिधी):

दि. ३० मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, धाराशिव जिल्ह्यातील अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला अट्टल आरोपी अजय श्रावण शिंदे हा सुंभा परिसरात आला आहे. मिळालेल्या माहितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देऊन पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची पथके तातडीने रवाना झाली.

पोलीसांनी संशयिताचा शोध घेत असताना अजय शिंदे याने पोलीसांना पाहताच पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांनी शिताफीने त्याला पकडले. त्याच्यासोबत श्रावण जमनाशा शिंदे यालाही ताब्यात घेण्यात आले.

सुरुवातीला आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. मात्र, अधिक विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर अजय शिंदे याने धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी, ढोकी, धाराशिव ग्रामीण, शिराढोण, मुरूम, लोहारा, वाशी, परंडा, येरमाळा व आनंदनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील घरफोडीचे एकूण ३२ गुन्हे आपल्या साथीदारांसह केल्याची कबुली दिली.

चौकशीदरम्यान आरोपीकडून घरफोडीच्या गुन्ह्यांमधील १८ तोळे सोने जप्त करण्यात आले. तसेच चोरीतील काही सोने विकून मिळालेल्या पैशांतून आरोपीने ब्रेझा चारचाकी वाहन आणि नवीन बुलेट दुचाकी खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी या वाहनांसह एकूण ४५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईमुळे धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी, ढोकी, धाराशिव ग्रामीण, शिराढोण, मुरूम, लोहारा, वाशी, परंडा, येरमाळा आणि आनंदनगर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील घरफोडीच्या मालिकेवर मोठा आळा बसण्याची शक्यता असून स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!