यशश्री अपडेट्स-बार्शी(प्रतिनिधी): तालुका कृषी विभागाने बार्शी शहरात एक मोठी कारवाई करत तब्बल ७ लाख ५२ हजार ६४० रुपये किमतीचे बोगस उडीद बियाणे जप्त केले आहे. या धडक कारवाईमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर हजारो शेतकऱ्यांची होणारी मोठी फसवणूक टळली आहे. याप्रकरणी बोगस बियाणे विक्रेत्यावर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२६ मे २०२६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला बोगस उडीद बियाणे विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कृषी विभागाने तातडीने बार्शी येथील स्वराज कॉलनीतील एका गोदामावर छापा टाकला.
धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात असलेल्या शेळगाव येथील ‘स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र’चे प्रोप्रायटर रत्नाकर रघुनाथ कोले यांनी हे बियाणे विक्रीसाठी आणले होते. नामांकित ‘निर्मल सीड्स प्रा. लि.’ कंपनीच्या ‘NUL 7 (विश्वास)’ या उडीद वाणाच्या बॅगची हुबेहूब नक्कल करून हे बोगस बियाणे विकले जात होते.
कृषी विभागाने गोदामातून २१६ बॅग आणि यापूर्वी विक्री झालेल्या १६८ बॅग, अशा एकूण ३८४ बॅग (प्रति ५ किलो) बियाणे जप्त केले. या जप्त केलेल्या बियाण्याची एकूण किंमत ७ लाख ५२ हजार ६४० रुपये आहे. या बोगस विक्रेत्यावर बार्शी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई सोलापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्रचार्य भोसले, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे आणि कुर्डुवाडीचे उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भरारी पथकाने केली. या मोहिमेत बार्शीचे तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अतुल जाधव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी बाळू बागल, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी किशोर अंधारे, सहाय्यक कृषी अधिकारी गणेश पाटील, निर्मल कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ भीमशेट्टी आणि शहर पोलीस ठाण्याचे प्रतिनिधी सचिन देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
