बावची येथे जलतारा प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी; विजय गायकवाड यांनी केले कौतुक, शेतकऱ्यांना भूजल वाढीचा संदेश

यशश्री अपडेट्स -परंडा (प्रतिनिधी )

मौजे बावची, ता. परंडा येथे सुरू असलेल्या जलतारा प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी परंडा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मा. विजय गायकवाड साहेब यांनी केली. या पाहणी दौऱ्यात त्यांनी जलसंधारणाच्या या उपक्रमाचे कौतुक करत गावातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले.
या दौऱ्यात गटविकास अधिकारी विजय गायकवाड यांच्यासोबत विस्तार अधिकारी शिंदे साहेब, विस्तार अधिकारी कुठे साहेब, इंजिनिअर पाटील साहेब तसेच ग्रामसेवक सौ. शितल गिरी मॅडम उपस्थित होते. पथकाने गट क्रमांक २३ मधील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य कानिफनाथ सरपणे यांच्या शेतात सुरू असलेल्या जलतारा कामाची पाहणी करून कामाची गुणवत्ता आणि परिणामकारकता तपासली.
पाहणीदरम्यान गटविकास अधिकारी विजय गायकवाड यांनी सुरू असलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी सांगितले की, जलतारा खड्डे हे केवळ जलसंधारणाचे साधन नसून भविष्यातील पाणीटंचाईवर प्रभावी उपाय ठरू शकतात. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात अशा प्रकारचे जलतारा खड्डे तयार करून भूजल साठा वाढविण्यास हातभार लावावा. वाढलेला भूजल साठा भविष्यात विहीर आणि बोरवेलमधील पाण्याची उपलब्धता वाढविण्यास उपयुक्त ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य कानिफनाथ सरपणे यांच्या हस्ते मा. विजय गायकवाड साहेब व त्यांच्या पथकातील मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला सरपंच नानासाहेब रोडगे, रोजगार सेवक नितीन रोडगे तसेच शेतकरी हनुमंत सरपणे, अभिमान टोणपे, तेजस सरपणे, दत्ता सरपणे, रामचंद्र क्षिरसागर, सचिन शिंदे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


                  |जलतारा प्रकल्पाचे महत्त्व |
जलतारा खड्ड्यांमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवले जाते. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या विहीर व बोरवेलमधील पाणी साठा वाढण्यात होतो. त्यामुळे गावातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात जलतारा खड्डे करून जलसंधारण चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन कानिफनाथ सरपणे (सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य, बावची) यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *