यशश्री अपडेट्स : बार्शी(प्रतिनिधी )
शासकीय नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या बार्शी-लातूर रोडवरील ‘लवंगी मिरची’ कला केंद्रावर बार्शी तालुका पोलिसांनी रविवारी (२४ मे) मध्यरात्री दीडच्या सुमारास धडक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी नृत्य करणाऱ्या नृत्यांगना, ग्राहक, चालक आणि मालक अशा एकूण ७२ लोकांवर गुन्हे दाखल केले असून, घटनास्थळावरून तब्बल ५० लाख १३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी गस्त व नाकाबंदीची मोहीम सुरू आहे.
यादरम्यान, ‘लवंगी मिरची’ कला केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही सुरू असल्याची विश्वासू माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तात्काळ या ठिकाणी धाड टाकली असता, तिथे नियमबाह्य पद्धतीने व्यवहार आणि नृत्य सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत रोख रक्कम आणि मोबाईल फोन, चारचाकी आणि दुचाकी वाहने, देशी दारूच्या बाटल्या व इतर साहित्य जप्त केले आहे.
या प्रकरणी सर्व संशयितांवर ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS), महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास बार्शी तालुका पोलीस करत आहेत. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सह पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, दत्तात्रय भालेराव व त्यांच्या पथकाने केली.
