‘बंगला’वरून भाजपात पुन्हा रणकंदन; जिल्हाध्यक्ष लक्ष्य, गुंड-भोसले आमनेसामने

यशश्री अपडेट्स | धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातील भाजपामधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेमुळे पक्षातील मतभेद उघडपणे समोर आले आहेत. प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. व्यंकटराव गुंड यांनी सोशल मीडियावर जिल्हाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘बंगला’ हा केंद्रबिंदू असलेली पोस्ट केल्यानंतर भाजपचे जिल्हा सरचिटणीस व प्रवक्ते अॅड. नितीन भोसले यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. या वादामुळे जिल्ह्यातील भाजपातील अंतर्गत संघर्षाचा दुसरा अध्याय सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

वादाची ठिणगी सोशल मीडियावरील पोस्टमधून पडली. अॅड. व्यंकटराव गुंड यांनी जिल्हाध्यक्षांचा कारभार स्वतःच्या निर्णयाने चालतो की ‘बंगल्याच्या आदेशावर’ असा सवाल उपस्थित केला. “पक्षाचे हित महत्त्वाचे की ‘बंगला’ हित? याचे उत्तर जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना मिळालेच पाहिजे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. या पोस्टनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार शब्दयुद्ध सुरू झाले आहे.

याचदरम्यान “शिकाऊ पैलवानांनी तालमीच्या वस्तादाला ओव्हरटेक करायला बघायचं नसतं… कळत ना?” अशी आणखी एक पोस्ट समोर आली. ‘वस्ताद’ या शब्दाच्या संदर्भावरूनही विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले असून, ही पोस्ट नेमकी कोणाला उद्देशून होती, यावर चर्चा सुरू आहे.

दरम्यान, अॅड. गुंड यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर टीका करताना जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनाही लक्ष्य केल्याने भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आल्याची माहिती समोर येत असून, पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करत अॅड. गुंड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजपमध्ये आणखी घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अॅड. नितीन भोसले यांनी प्रत्युत्तर देताना थेट अॅड. गुंड यांच्या राजकीय प्रवासावर प्रश्न उपस्थित केले. “जिल्हाध्यक्षांचा कारभार कसा चालतोय असा प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी स्वतःच्या राजकीय प्रवासाकडे पाहावे. चार पक्ष बदलत राहून आज निष्ठा आणि पक्षहिताचे प्रमाणपत्र वाटण्याचा अधिकार कुणालाही मिळत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

भोसले पुढे म्हणाले की, पक्षाच्या कठीण काळात कोण कार्यकर्त्यांसोबत उभे राहिले, कोण संघर्ष करत राहिले आणि कोण संधी पाहून बाजू बदलत गेले, हे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना चांगलेच ठाऊक आहे. “कोणाच्या आदेशावर कोण चालते यापेक्षा पक्षाच्या विचारांवर कोण ठाम उभे आहे हे महत्त्वाचे आहे. पक्ष हा कोणाच्या बंगल्याचा नसतो; तो विचारांचा आणि हजारो निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या घामाने उभा राहिलेला असतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाचाही भोसले यांनी जोरदार बचाव केला. त्यांच्या मते, २०१६ ते २०२० आणि २०२५ पासून आजपर्यंतचा काळ हा भाजपासाठी सर्वाधिक यशस्वी ठरला असून, दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी २८ वर्षे अखंड निष्ठेने पक्षासाठी काम केले आहे.

“विधानपरिषद निवडणुकीत आमदारकीची संधी मिळाल्यानंतरही पक्षाने सांगितल्यावर पक्षहितासाठी ती एका क्षणात सोडणारे जिल्हाध्यक्ष म्हणजे खरी निष्ठा. स्वतःच्या घरातील जिल्हा परिषद तिकीट न मिळाल्याने पक्षाच्या विरोधात काम करणारे आणि कमळ चिन्हाच्या विरोधात प्रचार करणारे आज निष्ठेची भाषा करीत आहेत,” असा आरोपही भोसले यांनी केला.

या वादामुळे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या विरोधात सुरू असलेल्या नाराजी मोहिमेलाही मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. जिल्हाध्यक्षांभोवती पक्ष संघटनेने घेतलेली भूमिका पाहता, पक्षातील गटबाजी आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धाराशिव भाजपातील हा संघर्ष केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित राहणार की संघटनात्मक पातळीवर त्याचे परिणाम दिसणार, याकडे आता जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः अॅड. व्यंकटराव गुंड यांच्यावरील संभाव्य शिस्तभंग कारवाई आणि वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!