यशश्री अपडेट्स | धाराशिव
धाराशिव भाजपमध्ये सध्या जुने आणि नवे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांच्यातील मतभेद आणि नाराजी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरू लागले आहेत. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षाच्या एका गटामध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेषतः नितीन काळे यांना दिलेल्या कथित अपमानास्पद वागणुकीनंतर पक्षातील काही कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
पक्षातील तिकीट वाटप, काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवणे, समर्थकांना पदे आणि लाभ मिळत असल्याची भावना, तसेच संघटनात्मक पातळीवरील संवादाचा अभाव अशा विविध मुद्द्यांवरून असंतोष वाढल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप नेते मल्हार पाटील यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी “काही नाती शब्दांपेक्षा भावनांनी जुळलेली असतात” असा संदेश दिला आहे. त्यामुळे या पोस्टकडे केवळ भावनिक अभिव्यक्ती म्हणून नव्हे, तर पक्षातील वाढता दुरावा कमी करण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.
समन्वयाची भूमिका पुन्हा चर्चेत
यापूर्वीही पक्षात मतभेद आणि नाराजी निर्माण झालेल्या काळात मल्हार पाटील यांनी समन्वयकाची भूमिका बजावल्याची चर्चा होती. त्यामुळे यावेळीही ते पक्षातील विविध गटांमध्ये संवादाचा दुवा ठरू शकतात, अशी राजकीय निरीक्षकांची प्रतिक्रिया आहे.
पक्षातील काही नेत्यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या तुलनेत मल्हार पाटील यांचा स्वभाव, कार्यपद्धती आणि आपुलकीची शैली अधिक जवळची वाटते, अशीही चर्चा पक्षाच्या वर्तुळात ऐकायला मिळत आहे.
अनेक नेत्यांच्या उपस्थितीमुळे वाढली चर्चा
मल्हार पाटील यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पालकमंत्री सरनाईक, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नगराध्यक्ष विनोद गंगणे, नितीन काळे, अनिल काळे, धनंजय सावंत, सुनील मालक चव्हाण, रणवीर राऊत, शरण पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये जुन्या आठवणी, स्नेहबंध आणि एकत्र काम केलेल्या क्षणांना उजाळा देण्यात आला आहे. त्यामुळे या व्हिडिओचा राजकीय संदेश नेमका काय आहे, याबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. या भावनिक सादेनंतर पक्षातील मनधरणीचे प्रयत्न वेग घेणार का, तसेच वाढलेला दुरावा कमी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मल्याळम गाण्याचा भावनिक स्पर्श
या व्हिडिओमध्ये “Makane X Koodappirannor” हे लोकप्रिय मल्याळम गाणे वापरण्यात आले आहे. हे गाणे कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित असून त्याचा आशय अत्यंत भावनिक आहे. मतभेद झाले तरी नातं तुटत नाही, एकमेकांपासून दूर जाऊ नये, आपल्या माणसांची साथ महत्त्वाची असते, आपण एकाच नात्याने जोडलेले आहोत, असा या गीताचा संदेश आहे.
याच संदेशाच्या माध्यमातून पक्षातील नेत्यांना एकीचे आवाहन करण्याचा प्रयत्न मल्हार पाटील यांनी केल्याचे मानले जात आहे.
भाजपातील अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा भावनिक व्हिडिओ नेत्यांमध्ये संवादाचे नवे दालन उघडतो का, की तो केवळ सोशल मीडियापुरताच मर्यादित राहतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
