संतप्त अनिल काळे यांनी जयकुमार गोरेंचाच रस्ता अडवून विचारला जाब**
यशश्री अपडेट्स | धाराशिव
राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे संपर्कमंत्री जयकुमार गोरे यांच्या धाराशिव दौऱ्यादरम्यान भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि गटबाजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल काळे यांना मंत्र्यांची भेट घेण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांनी थेट मंत्र्यांचा रस्ता अडवत जाब विचारल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद येथे आयोजित कार्यक्रमानंतर मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेण्यासाठी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल काळे हेही मंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना भेट घेण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या अनिल काळे यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या वाहनासमोर जाऊन त्यांचा रस्ता अडवला आणि थेट प्रश्न उपस्थित केले. “मी गेली 35 वर्षे भाजपसाठी एकनिष्ठपणे काम करत आहे. पक्षासाठी आयुष्य घालवलेल्या कार्यकर्त्यालाच मंत्र्यांची भेट मिळणार नसेल तर मग आम्ही काम कशासाठी करायचं? मला भेटण्यापासून का रोखण्यात आलं?” असा संतप्त सवाल त्यांनी मंत्र्यांसमोर केला.
घटनेच्या वेळी काही क्षण मंत्री जयकुमार गोरे यांनाही काय उत्तर द्यावे, असा प्रश्न पडल्याचे उपस्थितांनी सांगितले. परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित असल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी अनिल काळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तसेच झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यावेळी अनिल काळे यांनी आणखी गंभीर आरोप करत, “भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीच मला मंत्र्यांच्या भेटीपासून रोखले. मी पक्षासाठी 35 वर्षे प्रामाणिकपणे काम केले, मात्र आज मला स्वतःच्या पक्षातच अपमानास्पद वागणूक मिळत आहे,” असा दावा केला. त्यांच्या या आरोपांमुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही विविध चर्चांना उधाण आले.
संपर्कमंत्र्यांच्या अधिकृत दौऱ्यातच घडलेल्या या प्रकारामुळे धाराशिव भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. पक्षातील गटबाजी आता उघडपणे समोर येत असल्याचे बोलले जात असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
मात्र, या प्रकरणावर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे अनिल काळे यांनी केलेल्या आरोपांवर संबंधितांकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
