स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; 10 गाई, दोन पिकअपसह ₹18.05 लाखांचा मुद्देमाल जप्त

यशश्री अपडेट्स | धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातील येडशी टोलनाका परिसरात अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत 10 गाई आणि दोन पिकअप वाहने असा एकूण ₹18 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जुलै 2026 रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 187/2026 नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 मधील कलम 11(1)(ब) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, 1976 मधील कलम 5A(1) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणातील आरोपी दशरथ शंकर जगदाळे (वय 52, रा. हिवरा, ता. भूम) आणि बालाजी भिकाजी सोनवणे (वय 38, रा. भोनगिरी, ता. भूम) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने येडशी टोलनाका परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. कारवाईदरम्यान 10 गाईंसह दोन पिकअप वाहने जप्त करण्यात आली.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक आत्माराम जाधव, पोलीस हवालदार प्रदीप वाघमारे, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, पोलीस नाईक अशोक ढगारे, पोलीस कॉन्स्टेबल बोईनवाड, शेरखाने तसेच QRT पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे करीत असून, जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतुकीविरोधात यापुढेही अशाच प्रभावी कारवाया सुरू राहतील, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!