मतदार नोंदणी घोटाळ्यावर मोठी कारवाई! बीएलओ कादरींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

यशश्री अपडेट्स |धाराशिव (प्रतिनिधी ): निवडणूक कामात गंभीर निष्काळजीपणा करणे आणि राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसून मतदार नोंदणीचे काम करणे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) सय्यद जुनेद कादरी यांना चांगलेच भोवले आहे. त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० मधील कलम ३२ नुसार गुन्हा दाखल करण्याचे कडक आदेश प्रशासनाने दिले आहेत. या धडक कारवाईमुळे निवडणूक विभागात मोठी खळबळ उडाली असून, आणखी ६ बीएलओ कारवाईच्या रडारवर आहेत.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांच्या सूचनेवरून तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी ही कारवाई केली आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी मतदान केंद्र स्तरीय पर्यवेक्षक सतीश सोमाणी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

नेमके प्रकरण काय?

शम्स उलूम उर्दू हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांच्याकडे धाराशिव शहरातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, कादरी हे धाराशिव शहरातील काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका उजमा सबा अझहर पठाण यांच्या खाजगी कार्यालयात बसून मतदार नोंदणीचे (SSR मोहीम) काम करत असल्याचा प्रकार समोर आला. या प्रकाराचा व्हिडिओ निजाम नदाफ यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.

यानंतर भाजपचे धाराशिव-कळंब विधानसभा मतदार संघ प्रमुख ॲड. दत्तात्रय देवळकर आणि जिल्हा सरचिटणीस ॲड. नितीन भोसले यांनी थेट जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने कादरी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून समक्ष लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांनी सादर केलेला खुलासा अमान्य करत प्रशासनाने अखेर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. दैनिक ‘समय सारथी’ने या संपूर्ण प्रकाराचा सातत्याने पाठपुरावा केला होता.

कामातील हलगर्जीपणा आणि आकडेवारी:

तपासणी दरम्यान सय्यद जुनेद कादरी यांच्या निवडणूक कामकाजात प्रचंड निष्काळजीपणा आढळून आला:

  • एकूण मतदार: ९६४
  • फॉर्म वितरण: केवळ ५२० मतदारांना (४४४ मतदारांना अद्याप फॉर्म वाटप नाही).
  • कामकाजाची टक्केवारी: १५ दिवस उलटूनही केवळ ५३.९४% काम पूर्ण.
  • डिजीटलायझेशन: ९६४ पैकी केवळ ६४ फॉर्मचे डिजीटलायझेशन झाले.

या ढिसाळ कारभारामुळे संपूर्ण तालुक्याच्या निवडणूक कामकाजावर विपरीत परिणाम झाल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला आहे.

प्रशासनाचा गंभीर ठपका: “कादरी यांनी राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसून निवडणूक मोहीम राबवून गंभीर स्वरूपाचा कसूर केला आहे. निवडणूक आयोगाची ‘तटस्थता आणि पारदर्शकता’ या मूळ तत्त्वांचे तसेच वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचे त्यांनी जाणीवपूर्वक उल्लंघन केले आहे. राष्ट्रीय कर्तव्यातील बेजबाबदार वर्तनाबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.”

आणखी ६ बीएलओ रडारवर; कारणे दाखवा नोटीस जारी

याच प्रकरणात आणखी सहा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (BLO) राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने आणि प्रभावाने विशेष कॅम्प लावून मतदार नोंदणी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये खालील अधिकाऱ्यांचा समावेश आहे:

१. सुनील सुखदेव मोहीते २. बाबासाहेब महादेव बनकर ३. दीपक नेहालसिंग जारवाल ४. निवृत्ती चंदर देशमुख ५. बालाजी बापुसाहेब शिंदे ६. मनेष आत्माराम नवले

या सर्व ६ जणांना प्रशासनाने ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. कादरी यांच्यावरील कारवाईनंतर आता या उर्वरित ६ अधिकाऱ्यांबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निवडणूक प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा कडक संदेश या कारवाईतून जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!