उसाचे वाढे साठवा, निकृष्ट चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
चारा डेपो उभारणीवर भर; हायड्रोपोनिक-अझोला तंत्रज्ञानाची जनजागृती, पशुपालकांसमोर सकस चारा निर्मितीचे प्रात्यक्षिक
यशश्री अपडेट्स | धाराशिव
पावसाची अनिश्चितता आणि जिल्ह्यात निर्माण होऊ शकणारी संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन धाराशिव जिल्हा प्रशासनाने आतापासूनच नियोजनाला सुरुवात केली आहे. भविष्यात पशुधनासाठी चाऱ्याची कमतरता निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन, उसाच्या वाढ्यांचे संकलन व साठवणूक, चारा डेपोची निर्मिती तसेच निकृष्ट चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी युरिया प्रक्रियेचा वापर करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली २१ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग तसेच साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची विशेष आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पशुधनासाठी भविष्यातील चारा उपलब्धता, पर्यायी चारा निर्मिती आणि उपलब्ध चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दीपक मुळे, लातूरचे प्रगतशील पशुपालक रामभाऊ हांडगे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आणि विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उसाच्या वाढ्यांचे संकलन करून चारा डेपो उभारणार
ऊसतोडणीच्या काळात मोठ्या प्रमाणावर हिरवे वाढे उपलब्ध होतात. अनेकदा हे वाढे शेतातच पडून राहतात किंवा त्यांचा अपेक्षित वापर होत नाही. ऊसतोडणीसाठी हार्वेस्टरऐवजी मजुरांचा वापर झाल्यास मोठ्या प्रमाणात हिरवे वाढे उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे ऊसतोडणीनंतर मिळणारे वाढे वाया जाऊ न देता त्यांचे साखर कारखाना स्तरावर संकलन आणि योग्य पद्धतीने साठवणूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
भविष्यातील संभाव्य चारा टंचाईचा विचार करून या उपलब्ध वाढ्यांचा वापर करून चारा डेपो उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. साखर कारखान्यांनी यासाठी आवश्यक नियोजन करून उपलब्ध चारा सुरक्षित ठेवावा, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
हायड्रोपोनिक आणि अझोला तंत्रज्ञानाची जनजागृती
पारंपरिक चाऱ्याबरोबरच कमी जागेत आणि उपलब्ध साधनसामग्रीतून पर्यायी चारा तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हायड्रोपोनिक तसेच अझोला तंत्रज्ञानाबाबत पशुपालकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे यांनी दिली.
या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पशुपालकांना पर्यायी आणि सकस चारा निर्मितीच्या पद्धती समजावून देण्याबरोबरच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे त्याचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.
निकृष्ट चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविण्यावर भर
चारा उपलब्ध असणे पुरेसे नसून त्याचे पोषणमूल्यही योग्य असणे आवश्यक आहे. गव्हाचा भुसा, भाताचा पेंढा, ज्वारीचा कडबा यांसारख्या उपलब्ध मात्र तुलनेने निकृष्ट चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी युरिया प्रक्रियेचा उपयोग करता येतो.
प्रगतशील पशुपालक रामभाऊ हांडगे यांनी बैठकीत युरिया प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दीपक मुळे यांनी या प्रक्रियेचे फायदे सांगितले. त्यांच्या माहितीनुसार, योग्य पद्धतीने युरिया प्रक्रिया केल्यास चाऱ्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास आणि चाऱ्याची पाचकता सुधारण्यास मदत होते.
युरिया प्रक्रिया कशी करावी?
१०० किलो कोरड्या चाऱ्यासाठी ४० लिटर स्वच्छ पाण्यात ४ किलो युरिया मिसळून द्रावण तयार करावे. युरिया पूर्णपणे विरघळेपर्यंत मिश्रण व्यवस्थित ढवळावे. द्रावणात युरियाचे खडे शिल्लक राहणार नाहीत, याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
त्यानंतर प्लॅस्टिक कागदावर कुट्टी केलेल्या चाऱ्याचा साधारण ६ ते ८ इंच जाडीचा थर पसरावा. त्यावर झारीच्या साहाय्याने युरिया द्रावण समान प्रमाणात शिंपडावे. चाऱ्याचा थर व्यवस्थित दाबून त्यातील हवा बाहेर काढावी. त्यावर पुन्हा चाऱ्याचा थर देऊन त्यावर द्रावण शिंपडावे आणि तो चांगला दाबून घ्यावा. अशा पद्धतीने चाऱ्याचा ढीग तयार करावा.
तयार केलेला ढीग जाड प्लॅस्टिक कागदाने पूर्णपणे झाकून हवाबंद करणे आवश्यक आहे. कडांवर माती किंवा दगड ठेवून हवा आत जाणार नाही, याची काळजी घ्यावी. या प्रक्रियेसाठी साधारण २१ दिवसांचा किण्वन कालावधी आवश्यक असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले.
प्रक्रिया केलेला चारा देताना खबरदारी आवश्यक
२१ दिवसांनंतर प्रक्रिया केलेला चारा उघडल्यानंतर अमोनियाचा वास पूर्णपणे कमी होणे आवश्यक आहे. त्यामुळे जनावरांना देण्यापूर्वी हा चारा २ ते ३ तास सावलीत पसरून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
जनावरांना सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केलेला चारा देऊ नये. पहिल्या आठवड्यात कमी प्रमाणात सुरुवात करून हळूहळू त्याचे प्रमाण वाढवावे. सहा महिन्यांपेक्षा लहान वासरांना युरिया प्रक्रिया केलेला चारा देऊ नये. एकदा ढीग उघडल्यानंतर उर्वरित चारा पाऊस आणि ओलाव्यापासून सुरक्षित ठेवून कोरड्या व हवेशीर ठिकाणी साठवावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
घरच्या घरीही तयार करता येणार सकस चारा
बैठकीदरम्यान पशुपालकांसाठी घरच्या घरी उपलब्ध साधनांचा वापर करून सकस चारा तयार करण्याचे प्रात्यक्षिकही देण्यात आले. मोठ्या पशुधनासाठी ३ ते ४ किलो कुट्टी केलेले पाचट किंवा इतर कुट्टी केलेल्या चाऱ्यामध्ये गूळ मिश्रण, मीठ, भरडा आणि शेंगदाणा किंवा इतर पेंड योग्य प्रमाणात मिसळून त्यात पाणी घालावे. हे मिश्रण काही काळ हवाबंद ठेवून त्यानंतर जनावरांना देता येते, अशी माहिती प्रात्यक्षिकातून देण्यात आली.
टंचाईपूर्वीच नियोजन करण्याचे आवाहन
संभाव्य चारा टंचाईच्या काळात केवळ उपलब्ध चाऱ्याच्या साठ्यावर अवलंबून न राहता उपलब्ध निकृष्ट चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविणे, उसाचे वाढे जतन करणे आणि हायड्रोपोनिक-अझोला यांसारख्या पर्यायी पद्धतींचा वापर करणे आवश्यक आहे.
पावसाची परिस्थिती आणि भविष्यातील चारा उपलब्धता लक्षात घेऊन पशुपालकांनी आतापासूनच नियोजन करावे. उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर करून पशुधनाला सकस व पौष्टिक आहार मिळेल, याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
