श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी २८१ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र अर्पण; उमरखेडच्या चिन्मय मूर्ती संस्थानचा भक्तीभाव!

यशश्री अपडेट्स (धाराशिव): साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी रविवारी (१२ जुलै २०२६) यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानच्या वतीने २८१ ग्रॅम वजनाचे सुवर्ण मंगळसूत्र अत्यंत भक्तीभावाने अर्पण करण्यात आले. या मंगल सोहळ्याने तुळजापूर नगरीत भक्तीचा पूर ओसंडून वाहिला.

विधिवत पूजा आणि ओटी भरण

श्री क्षेत्र उमरखेड (जि. यवतमाळ) येथील प्रसिद्ध श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद गुरुवामनानंद स्वामी महाराज हे रविवारी तुळजापूर भेटीवर होते. त्यांच्या शुभहस्ते श्री तुळजाभवानी मातेस विधिवत अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मुख्य गाभाऱ्यात पूजा-अर्चा करून मातेची खणानारळाने ओटी भरण्यात आली.

सुवर्ण मंगळसूत्र अर्पण

या पवित्र धार्मिक विधीनंतर श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे कुलमुखत्यार ॲड. श्री महेश कनकदंडे व सौ. मोहिनीताई कनकदंडे यांनी कुलस्वामिनीच्या गळ्यात घालण्यासाठी २८१ ग्रॅम वजनाचे आकर्षक सोन्याचे मंगळसूत्र मंदिर संस्थानकडे सुपूर्द केले. मातेच्या चरणी अर्पण केलेल्या या सुवर्ण अलंकाराची आणि कनकदंडे परिवाराच्या दातृत्वाची मंदिर परिसरात मोठी चर्चा होती.

मंदिर संस्थानतर्फे स्वामी महाराजांचा विशेष सन्मान

परमपूज्य माधवानंद गुरुवामनानंद स्वामी महाराज यांच्या आगमन आणि दर्शनासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने विशेष डोलीची व्यवस्था करण्यात आली होती. डोलीतून स्वामी महाराजांना सन्मानाने गाभाऱ्यापर्यंत नेण्यात आले.

मातेच्या दर्शनानंतर मंदिर संस्थानच्या वतीने परमपूज्य स्वामी महाराज तसेच ॲड. श्री महेश कनकदंडे आणि सौ. मोहिनीताई कनकदंडे यांचा श्री देवीजींची विलोभनीय प्रतिमा आणि पवित्र महावस्त्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी तुळजाभवानीचे पुजारी, संस्थानचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Leave a Reply