पुण्यात ‘धाराशिव फाउंडेशन’चा तृतीय वर्धापन दिन सोहळा उत्साहात; ८ मान्यवरांना ‘धाराशिव भूषण’ तर गुणवंतांचा गौरव
यशश्री अपडेट्स | पुणे | प्रतिनिधी: धाराशिव जिल्ह्याची अस्मिता, एकजूट आणि मातृभूमीशी असलेली नाळ अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘धाराशिव फाउंडेशन’च्या तृतीय वर्धापन दिन सोहळ्याला धाराशिवकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टिळक स्मारक सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्यात बोलताना आमदार कैलास पाटील यांनी, “आपला जीव धाराशिव; हीच ओळख, एकजूट आणि आपल्या मातीची ताकद आहे,” असे भावनिक प्रतिपादन केले. पुण्यात राहूनही आपली संस्कृती आणि गावाकडची नाळ जपणाऱ्या नागरिकांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्नेहमेळावा, गुणवंत विद्यार्थी सन्मान आणि ‘धाराशिव भूषण सन्मान-२०२६’ हा त्रिसूत्री कार्यक्रम होता. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरामध्ये विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या हजारो धाराशिवकरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून आपल्या जन्मभूमीशी असलेले भावनिक नाते अधिक घट्ट केले. संपूर्ण सभागृह धाराशिवकरांच्या अभूतपूर्व गर्दीने आणि उत्साहाने ओसंडून वाहत होते.
८ कर्तृत्ववान व्यक्तींना ‘धाराशिव भूषण सन्मान-२०२६’
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून धाराशिव जिल्ह्याचे नाव राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करणाऱ्या आठ मान्यवरांना यावेळी ‘धाराशिव भूषण सन्मान-२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.
सन्मानित करण्यात आलेले मानकरी पुढीलप्रमाणे:



- उमेश जगताप (कला व चित्रपट क्षेत्र)
- रोहित कोकाटे (चित्रपट क्षेत्र)
- अभिलाषा बेलुरे (महिला सक्षमीकरण)
- गोरख भोरे (उद्योग व सामाजिक सेवा)
- सागर जाधव (कृषी तंत्रज्ञान क्षेत्र)
- श्रीकृष्ण कळंबकर (उद्योग क्षेत्र)
- खंडेराव मुळे (संगीत व कला क्षेत्र)
- गणेश पावशेरे (उद्योग व संशोधन क्षेत्र)
या मान्यवरांच्या थक्क करणाऱ्या प्रवासाची माहिती ऐकताना उपस्थितांची छाती अभिमानाने फुगून आली होती.
गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक अन् प्रा. विठ्ठल कांगणे यांचे प्रेरणादायी व्याख्यान
केवळ मान्यवरांचाच नव्हे, तर जिल्ह्याचे भविष्य असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या पालकांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. विविध परीक्षा आणि क्षेत्रांत चमकदार कामगिरी करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्यात आले.
या सोहळ्यात प्रसिद्ध व्याख्याते प्रा. विठ्ठल कांगणे यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना मार्गदर्शन केले. आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीत बोलताना त्यांनी यश प्राप्तीचे मार्ग, पालकांची भूमिका आणि जिद्द यावर प्रकाश टाकला. त्यांच्या या प्रेरणादायी व्याख्यानाने संपूर्ण सभागृहातील वातावरण भारावून गेले होते.
भविष्यातील सामाजिक कार्याचा संकल्प
धाराशिव फाउंडेशनच्या वतीने आगामी काळातही अशाच प्रकारे समाजातील गुणवंतांचा गौरव करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक व करिअरसाठी प्रोत्साहन देणे, सामाजिक सलोखा राखणे आणि पुणे परिसरातील धाराशिवकरांमधील एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्यासाठी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी धाराशिव फाउंडेशनचे सर्व समन्वयक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर आणि धाराशिवकरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यात जणू ‘छोटा धाराशिव’ अवतरल्याचा भास होत होता.
