जरांगे पाटीलांचा मोठा निर्णय; १५ सप्टेंबरला मोजक्या सहकाऱ्यांसह मुंबईकडे रवाना

दोन गाड्या, दोन रुग्णवाहिका आणि केवळ पाच जण सोबत; समाजबांधवांनी मुंबईला येऊ नये, जरांगे पाटलांचे आवाहन

यशश्री अपडेट्स | अंतरवाली सराटी, दि. १४ सप्टेंबर

मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. १५ सप्टेंबर २०२६ रोजी दोन वाहने, दोन रुग्णवाहिका आणि केवळ पाच सहकाऱ्यांना सोबत घेऊन आपण मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याचे जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, समाजबांधवांनी मोठ्या संख्येने मुंबईकडे सोबत येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

जरांगे पाटील म्हणाले की, आपण मोजक्या लोकांसह मुंबईकडे जाणार असल्याने आता सरकारने आंदोलनासाठी परवानगी द्यावी, अशी अपेक्षा आहे. समाजाने यापूर्वी बुक केलेल्या गाड्या मात्र रद्द करू नयेत. उलट आवश्यकतेनुसार गाड्यांची संख्या वाढवत तयारी कायम ठेवावी; मात्र माझ्या पुढील निरोपाची वाट पाहावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

नियोजित मुक्काम कायम

मुंबईकडे जाणाऱ्या नियोजित दौऱ्यातील मुक्कामाच्या ठिकाणांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली येथे नियोजित मुक्काम होणार आहे. या प्रवासानंतर मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मुक्कामाच्या ठिकाणी कोणाच्या घरात किंवा मंगल कार्यालयात राहण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी साध्या पद्धतीने व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी समाजबांधवांना दिल्या. सार्वजनिक ठिकाणी पत्रे टाकून मुक्कामाची व्यवस्था करावी आणि तेथेच उपोषणासाठी बसण्याची तयारी ठेवावी, असे त्यांनी सांगितले.

रस्त्यात समाजबांधवांना भेटण्याचे आवाहन

जरांगे पाटील मुंबईकडे जात असताना त्यांच्या मार्गावर समाजबांधव निरोप देण्यासाठी किंवा शुभेच्छा देण्यासाठी येऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र मोठ्या संख्येने त्यांच्या सोबत मुंबईकडे जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.

प्रवासादरम्यान प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी भाषण होईलच असे नाही. तब्येत ठीक असेल आणि शक्य झाले तरच मुक्कामाच्या ठिकाणी भाषण करणार, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

रस्त्यात भोजनाची व्यवस्था करू नका

मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर समाजबांधवांसाठी भोजन आणि इतर सुविधा उभारण्याचे जे नियोजन करण्यात आले होते, ते सध्या करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. रस्त्यातील भोजनाची व्यवस्था करण्यासाठी ठेवलेले नियोजन पुढील काळात मुंबईतील आंदोलनासाठी उपयोगात आणता येईल. त्यामुळे सध्या अनावश्यक खर्च किंवा व्यवस्था करू नका, असे त्यांनी समाजबांधवांना सांगितले.

गावोगावी शांतता रॅली काढण्याचे आवाहन

दरम्यान, मुंबईकडे जाण्याच्या काळात समाजबांधवांनी गावोगावी आणि तालुका स्तरावर शांतता रॅली काढावी, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने सुरू ठेवण्यावर त्यांनी भर दिला.

मुंबईतील आंदोलनासाठी तयारी सुरू असतानाच जरांगे पाटील यांनी स्वतः मोजक्या सहकाऱ्यांसह मुंबईकडे जाण्याचा निर्णय जाहीर केल्याने मराठा आंदोलनाच्या पुढील टप्प्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आता सरकारकडून या भूमिकेवर काय प्रतिक्रिया येते आणि मुंबईतील आंदोलनाबाबत पुढील निर्णय काय होतो, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!