मनोज जरांगे-पाटील यांची घोषणा; अंतरवाली सराटीतून सकाळी ११ वाजता कूच; सरकारला मुंबईपर्यंत मागण्या मान्य करण्याची संधी
यशश्री अपडेट्स | वडीगोद्री (जि. जालना)
मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता निर्णायक वळण मिळाले आहे. मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी अखेर मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली असून, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अंतरवाली सराटी येथून मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा जरांगे-पाटील यांनी केली.
शनिवारी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजबांधवांसोबत झालेल्या राज्यव्यापी बैठकीत त्यांनी मुंबई आंदोलनाचे मार्गक्रमण, मुक्काम आणि पुढील नियोजन जाहीर केले. “मुलांच्या भविष्यासाठी या लढ्यात सहभागी व्हा,” असे आवाहन करत त्यांनी राज्यातील मराठा बांधवांना मुंबईकडे निघण्याचे आवाहन केले.
१५ सप्टेंबरला अंतरवालीतून मुंबईकडे प्रस्थान
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजबांधवांनी गणपतीची स्थापना करून १५ सप्टेंबरला मुंबईकडे रवाना व्हावे, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले. अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले उपोषण थांबविले जाणार नसून, उपोषण करतच मुंबईकडे जाणार, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चासाठी त्यांनी टप्प्याटप्प्याने मार्ग आणि मुक्काम निश्चित केला आहे.

१५ सप्टेंबर – पहिला मुक्काम : पाटोदा (जि. बीड)
अंतरवाली सराटी – शहागड – गेवराई – बीड – मांजरसुंबा – लिंबागणेश मार्गे आंदोलक पाटोदा येथे मुक्कामी राहतील.
१६ सप्टेंबर – दुसरा मुक्काम : श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर)
१७ सप्टेंबर – तिसरा मुक्काम : हडपसर (पुणे)
पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील मराठा बांधव या टप्प्यावर मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.
१८ सप्टेंबर – चौथा मुक्काम : खोपोली
१९ सप्टेंबर – अंतिम टप्पा : मुंबईतील आझाद मैदान
१९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर तेथेच बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले आहे.
सरकारला मुंबईपर्यंत संधी
हैदराबाद गॅझेटच्या आधारे शपथपत्र देण्यासंदर्भात अध्यादेश काढण्याचे सरकारने आश्वासन दिले होते. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, असा आरोप जरांगे-पाटील यांनी केला.
“आम्ही मुंबईला येईपर्यंत सरकारकडे संधी आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या आणि मार्ग काढा. मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या तर आम्ही मुंबईला येणार नाही,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
त्यामुळे आगामी काही दिवसांत सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मुंबई आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाकारली
दरम्यान, आझाद मैदानावर उपोषण आणि आंदोलन करण्यासाठी जरांगे-पाटील यांच्या वतीने पोलिसांकडे परवानगीचा अर्ज करण्यात आला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे.
परवानगी नाकारल्याचे वृत्त समजल्यानंतर जरांगे-पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी पुन्हा उपचार आणि पाणी घेणे सोडल्याचे जाहीर केले. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे सरकार पालन करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
“आम्ही मात्र न्यायदेवतेच्या नियमांप्रमाणे आणि संविधानाप्रमाणे चालतो. सरकारने कायदा पायदळी तुडवला तर न्यायदेवता न्याय देते,” असे जरांगे-पाटील यांनी म्हटले.
गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळात मराठा आंदोलक मुंबईत शांततेच्या मार्गाने आले होते आणि आंदोलनानंतर शांततेत परतले होते. यावेळी मात्र परवानगी नाकारण्यात आल्याने त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.
‘परवानगी नाकारणे हे फडणवीसांचे षड्यंत्र’ – मनोज जरांगे पाटील

मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारण्यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोपही जरांगे-पाटील यांनी केला. “परवानगी नाकारणे म्हणजे फडणवीसांनी रचलेले षड्यंत्र आहे,” असा आरोप त्यांनी केला.
त्यामुळे मराठा आंदोलनाचा पुढील टप्पा अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गणेशोत्सव काळात आंदोलन करू नका – बावनकुळे
दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना गणेशोत्सव काळात मुंबईत आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे.
नागपुरात माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, मुंबईतील आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा विचार करून सर्व आंदोलकांनी काळजी घ्यावी.
“मुंबई आणि महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा देशातील सर्वांत मोठा उत्सव आहे. या काळात कोणीही आंदोलन करू नये,” असे आवाहन त्यांनी केले.
मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकारची भूमिका स्पष्ट करताना बावनकुळे यांनी ओबीसी असो किंवा मराठा समाज, कोणाचाही हक्क डावलता येणार नाही, असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाची पुढील दिशा काय?
एकीकडे जरांगे-पाटील यांनी १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे मुंबई पोलिसांकडून आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या प्रवासात कायदा-सुव्यवस्था, आंदोलनाचा मार्ग आणि मुंबईतील प्रवेशाबाबत प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांवर सरकारने तोडगा काढला नाही, तर १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्धार जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
