धाराशिव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; दुष्काळी जीआरचीही केली होळी, हेक्टरी एक लाख रुपयांच्या मदतीची मागणी
यशश्री अपडेट्स|धाराशिव :
विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेच्या माध्यमातून मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर फेरफार होत असल्याचा आरोप करत धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश इंद्रसिंह राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे आणि माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात घोषणाबाजी करत आपली भूमिका मांडली.
काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे घटनात्मक कर्तव्य आहे. मात्र, मागील काही काळात आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा संशय निर्माण झाला असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
SIR प्रक्रियेवर काँग्रेसचे गंभीर आरोप

विशेष सखोल पुनरावलोकन अर्थात SIR प्रक्रियेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे, SIR प्रक्रिया तसेच निवडणूक आयोगाच्या माहिती-तंत्रज्ञान प्रणालीच्या केंद्रीकरणासंदर्भातील निर्णय घेताना सहकारी निवडणूक आयुक्तांना विश्वासात घेतले जात नसल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या काही निर्णयांवर त्यांच्या सहकारी निवडणूक आयुक्तांनी आक्षेप नोंदवल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याचा उल्लेख काँग्रेसने केला आहे. गेल्या दहा महिन्यांत किमान १४ वेळा अधिकृत आक्षेप नोंदविण्यात आल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा, बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे हटविण्यात आल्याचा तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदार यादीबाबत कथित अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या सर्व प्रकरणांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कथित गैरप्रकारांबाबत पुरावे सादर केल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी संबंधित आरोपांची तातडीने चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी भूमिका काँग्रेसने मांडली.
दुष्काळी जीआरची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी

दरम्यान, राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी जीआरविरोधातही काँग्रेसने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुष्काळी जीआरची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. शासनाने काढलेल्या जीआरमध्ये आवश्यक ती स्पष्टता नसून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा हा निर्णय असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा तातडीने आढावा घेऊन ठोस मदत जाहीर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

या आंदोलनात राजेंद्र शेरखाने, मलंग शेख, पांडुरंग तात्या कुंभार, प्रशांत पाटील, विलास साळू, खलील सय्यद, ॲड. सय्यद इनामदार, धनंजय राऊत, ॲड. जावेद काझी, अग्निवेश शिंदे, विनोद वीर, आप्पासाहेब शेळके, दयानंद पाटील, सोमनाथ मिश्किन, सिराज मोगल, अमर तागडे, अरविंद बागडे, अर्जुन बिराजदार, पृथ्वीराज देशमुख, महबूब पटेल, अमोल कुतवळ, गोदावरी केंद्रे, मनीषा वाघमारे, मिलिंद गोवर्धन, शिवानंद तोडकर, महेश म्हेत्रे, गणेश पवार, सरफराज काझी, गोरोबा झेंडे, प्रभाकर लोंढे, संकेत पडवळ, फुरखान शेख, आबेदीन कुरेशी, नसीर इनामदार, सईद बागवान, पोपट शिंदे, मोईज सय्यद, भारत काटे, जीवन चौगुले यांच्यासह प्रदेश पदाधिकारी, विविध सेलचे प्रमुख, तालुका कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला, विद्यार्थी आणि युवक पदाधिकारी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी मतदार यादी आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी करावी, तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
