अंतरवली सराटीत आमदार कैलास पाटील यांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; तब्येतीची केली विचारपूस

सरकारने आश्वासनांचा खेळ थांबवून ठोस कायदेशीर निर्णय घ्यावा; कैलास पाटलांचा सरकारला इशारा

यशश्री अपडेट्स | अंतरवली सराटी :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असताना धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी मंगळवारी आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट देत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली.

मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाच्या मार्गावर आहेत. गेल्या तीन दिवसांपासून ते अन्नत्याग करत असल्याने त्यांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होत आहे. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव उपस्थित असून, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विविध भागांतून पाठिंबा मिळत आहे.

आमदार कैलास पाटील यांनी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. उपोषणामुळे होणारा शारीरिक त्रास आणि दिवसेंदिवस खालावत चाललेली प्रकृती ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणाचा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नसून तो लाखो मराठा बांधवांच्या भावना आणि भवितव्याशी जोडलेला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘आश्वासनांचा खेळ आणखी किती दिवस?’

यावेळी राज्य सरकारच्या भूमिकेवर आमदार कैलास पाटील यांनी तीव्र शब्दांत टीका केली. सरकारकडून वारंवार आश्वासने दिली जातात, शब्द दिले जातात; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीची वेळ आली की टाळाटाळ केली जाते, असा आरोप त्यांनी केला.

“राज्य सरकार प्रत्येक वेळी आश्वासनं देतं, शब्द देतं; पण प्रत्यक्ष अंमलबजावणीची वेळ आली की टाळाटाळ करतं. आश्वासनं देऊन वेळ मारून नेण्याचा हा खेळ आणखी किती दिवस चालणार? लाखो मराठा बांधवांच्या भावनांशी आणि विश्वासाशी सरकारने आता खेळू नये,” अशी भूमिका आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली.

‘ठोस कायदेशीर निर्णय घ्या’

मराठा आरक्षणाचा प्रश्न लांबणीवर न टाकता सरकारने तातडीने ठोस भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. सरकारने दिलेला शब्द पाळून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी कायदेशीरदृष्ट्या टिकणारा आणि ठोस निर्णय घेणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले.

सरकारने वेळकाढूपणा आणि फसव्या आश्वासनांचा खेळ तातडीने थांबवावा. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत स्पष्टता आणून त्यावर ठोस तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

‘मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका’

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आपल्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन करत आहे. त्यामुळे सरकारने परिस्थिती अधिक चिघळण्यापूर्वी संवाद आणि निर्णयाचा मार्ग स्वीकारावा, अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली.

“आपल्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या संपूर्ण मराठा समाजाच्या संयमाचा अंत सरकारने पाहू नये,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, आमदार कैलास पाटील यांच्या भेटीमुळे आंदोलनस्थळी राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. सरकारने तातडीने सकारात्मक पाऊल उचलून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या मराठा बांधवांकडूनही केली जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस सुरू असताना सरकार आता कोणती भूमिका घेते आणि आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी पुढील पाऊल काय उचलते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!