यशश्री अपडेट्स-मुंबई/कोकण:
दि. ४ : पुणे शहरात घडलेल्या विषारी दारू दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोकण विभागात अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. २९ मे ते २ जून २०२६ या कालावधीत ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये एकूण ३१३ गुन्हे नोंदवून २१३ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान १ कोटी ५८ लाख १७ हजार ५४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथके स्थापन करून हातभट्टी निर्मितीची केंद्रे उद्ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतली. ठाणे जिल्ह्यातील दिवा गावखाडी, घेसर, अंजूर, अलीमघर, छोटी देसाई, मोठी देसाई, आगासन, खर्डी, सरळांबे, वाशाळा, घोरपे, पालेगाव, सावरणे, वेळू, कोरावले, वसारगाव, हाजीमलंग, कुशिवली, माणेरागाव, द्वारलीपाडा, कुंभार्ली, केवणी, कालवार, वडुनवघर, मामेखर्डी, कारीवली, मामणोली, जांभुळगाव, नांदपगाव, उत्तन, मुरदागाव, कोपराखाडी आणि गोराई खाडी परिसरात गुन्हे नोंद करून हातभट्टी निर्मिती केंद्रे नष्ट करण्यात आली.
पालघर जिल्ह्यातील मालजीपाडा, वसई, विरार आणि पालघर परिसरातही कारवाई करत अवैध दारू निर्मिती केंद्रांवर धडक कारवाई करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील रावेगाव, बेकरेगाव आणि जावळीगाव येथेही हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.
याशिवाय अवैध मद्य वाहतुकीविरोधात कारवाई करून आठ वाहने जप्त करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी पुढील काळातही अशाच कठोर कारवाया सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरात बनावट मद्य, परराज्यातील अवैध मद्य, हातभट्टी दारू किंवा मिथेनॉल, क्लोरेल हायड्रेटसारख्या घातक रसायनांचा वापर होत असल्याची माहिती आढळल्यास १८००२३३९९९९ या टोल-फ्री क्रमांकावर अथवा ८४२२००११३३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.


