जरांगे पाटील यांच्या उपोषणाचे राज्यभर पडसाद; सिल्लोडमध्ये रास्तारोको, माढ्यात सहकार मंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
यशश्री अपडेट्स | माढा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज, २९ ऑगस्टपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. हे उपोषण निर्णायक ठरणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत मोठ्या संख्येने मराठा समाज धडकणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या आंदोलनाचे पडसाद आता राज्याच्या विविध भागांत उमटू लागले असून, अनेक ठिकाणी आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वाहनाचा मराठा आंदोलकाने पाठलाग करत ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी संबंधित आंदोलकाने थेट मंत्र्यांच्या वाहनाखाली जाण्याचा प्रयत्न केल्याने घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मंत्र्यांच्या वाहनाचा पाठलाग; गाडीखाली जाण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, बापू गायकवाड या मराठा आंदोलकाने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वाहनाचा पाठलाग केला. त्यानंतर त्याने धावत्या वाहनासमोर जाऊन ते अडवण्याचा प्रयत्न केला आणि वाहनाखाली जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांची धावपळ उडाली.
या घटनेमुळे मंत्र्यांच्या ताफ्याजवळ मोठा गोंधळ निर्माण झाला. यावेळी आंदोलकांकडून ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देण्यात आल्या.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी संबंधित आंदोलकाला वाहनाखालून बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा ताफा तुळजापूरच्या दिशेने रवाना झाला.
विशेष म्हणजे, हा प्रकार घडत असताना मंत्री बाबासाहेब पाटील हे आपल्या वाहनातच होते. त्यांनी वाहनातून खाली न उतरता परिस्थितीचा सामना वाहनात बसूनच केल्याचे दिसून आले.
सिल्लोडमध्येही रास्तारोको
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सुरुवात होताच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथेही आंदोलनाचे पडसाद उमटले. आंदोलकांनी छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर रास्तारोको केला. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.
आंदोलकांनी रस्त्यावरच ‘बेमुदत रास्तारोको’ असा बॅनर लावल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे प्रशासनासमोर वाहतूक सुरळीत करण्याचे आव्हान निर्माण झाले.
जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटी येथे सुरू केलेले हे उपोषण निर्णायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत किंवा आंदोलनाबाबत चालढकल केली, तर मुंबईकडे कूच करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मुंबईत मोठ्या संख्येने मराठा समाज एकत्र येईल, असा दावा त्यांनी केला आहे.
त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाकडून आंदोलनाची भूमिका घेतली जाते का, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
माढ्यात मंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न आणि सिल्लोडमधील रास्तारोको या घटनांमुळे जरांगे पाटील यांच्या नव्या आंदोलनाची तीव्रता पहिल्याच दिवशी अधोरेखित झाली आहे. आता सरकार या आंदोलनावर काय भूमिका घेते आणि पुढील काळात आंदोलन कोणते वळण घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
