भूम नगर परिषदेत राजकीय हालचालींना वेग; १५ नगरसेवक पक्षप्रवेशाच्या तयारीत?

जनशक्ती विकास आघाडीतील नगरसेवकांमध्ये अस्वस्थता; धनुष्यबाण, कमळ की घड्याळ, निर्णयाकडे भूमकरांचे लक्ष

यशश्री अपडेट्स | भूम : भूम नगर परिषदेत गेल्या काही दिवसांपासून राजकीय हालचालींना वेग आला असून, सत्ताधारी जनशक्ती विकास आघाडीतील तब्बल १५ नगरसेवक पक्षप्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नगर परिषदेत सत्तेचे समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाल्याने भूम शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र हे नगरसेवक नेमक्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

भूम नगर परिषद निवडणुकीत विविध राजकीय पक्ष व स्थानिक नेत्यांनी एकत्र येत जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. या आघाडीला मतदारांनी चांगला प्रतिसाद देत एकूण २० पैकी १४ नगरसेवक निवडून दिले होते. याशिवाय एक स्वीकृत सदस्य असल्याने आघाडीचे संख्याबळ १५ वर पोहोचले होते. दुसरीकडे अल्पमतातील अलमप्रभू विकास आघाडीचे सहा नगरसेवक व एक स्वीकृत सदस्य, तसेच नगराध्यक्ष विजयी झाले होते. त्यामुळे नगर परिषदेत सत्तेचे गणित तुलनेने स्थिर असल्याचे चित्र सुरुवातीला दिसत होते.

राजकीय दबावाच्या आरोपांनी अस्वस्थता

मात्र गेल्या काही महिन्यांपासून जनशक्ती विकास आघाडीतील नगरसेवकांमध्ये नाराजी वाढत असल्याची चर्चा आहे. प्रशासनाच्या माध्यमातून अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप काही नगरसेवकांकडून केला जात आहे. विशेषतः प्रभागातील विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि विविध प्रस्तावांच्या अंमलबजावणीवरून नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगितले जाते.

काही नगरसेवकांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून आपल्यावर दबाव आणला जात असल्याचेही खाजगीत बोलून दाखवले आहे. महिला मुख्याधिकाऱ्यांना पुढे करून खोटे आरोप केले जात असल्याचा आरोपही काही नगरसेवकांनी केला आहे. या आरोपांमुळे नगर परिषद प्रशासन आणि सत्ताधारी गटातील संबंध ताणले गेल्याची चर्चा आहे.

नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, प्रभागातील नागरिकांच्या मागणीनुसार विकासकामे करण्याचा प्रयत्न केला जात असताना विविध प्रशासकीय कारणांमुळे कामांना विलंब होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही नाराजी वाढत असून, त्याचा थेट फटका नगरसेवकांना बसत आहे.

नागरिकांच्या प्रश्नांवरूनही नाराजी

भूम शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा, वीज, रस्ते, नाल्या आणि मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रभागातील समस्या घेऊन नागरिक नगरसेवकांकडे येतात; मात्र प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नगरसेवकांची कोंडी होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

यामुळेच काही नगरसेवक आता राजकीय पर्यायाचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्यास प्रभागातील विकासकामांना गती मिळेल आणि प्रशासनातील अडथळे दूर होतील, अशी भूमिका काही नगरसेवकांनी घेतल्याचे सांगितले जाते.

जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठी

या पार्श्वभूमीवर काही नगरसेवकांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती आहे. आपल्या अडचणी, राजकीय दबाव आणि प्रभागातील विकासकामांची परिस्थिती संबंधित नेत्यांसमोर मांडण्यात आल्याचे समजते.

एका नगरसेवकाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बड्या नेत्यांकडून ‘आधी प्रवेश करा, त्यानंतरची सर्व जबाबदारी आमची’ असा शब्द देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षप्रवेशाची चर्चा आता केवळ अफवा न राहता प्रत्यक्ष राजकीय हालचालींच्या टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र आहे.

धनुष्यबाण, कमळ की घड्याळ?

भूम नगर परिषदेत सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे हे नगरसेवक कोणत्या पक्षात प्रवेश करणार हा आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण, भारतीय जनता पक्षाचे कमळ की राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ, यापैकी कोणत्या चिन्हाखाली हे नगरसेवक जाणार, याबाबत राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

विविध पक्षांकडून नगरसेवकांशी संपर्क सुरू असल्याची चर्चा असून, काही संभाव्य प्रवेशासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचेही बोलले जात आहे. मात्र संबंधित नगरसेवक किंवा कोणत्याही पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांकडून अद्याप या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत स्पष्ट घोषणा करण्यात आलेली नाही.

नितीन शिनगारे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची

आघाडीतील बहुतांश नगरसेवकांनी एकत्रित भूमिका घेतल्यास भूम नगर परिषदेतील विद्यमान राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकते. त्यामुळे आगामी काही दिवसांत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे शहरातील राजकीय कार्यकर्त्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

विकासकामे की राजकीय समीकरणे?

नगर परिषदेत सत्तांतराच्या चर्चेला वेग येत असताना शहरातील नागरिकांसमोर मात्र मूलभूत सुविधांचे प्रश्न कायम आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, स्वच्छता आणि प्रभागनिहाय विकासकामे या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाला तर त्याचा परिणाम केवळ पक्षीय राजकारणापुरता मर्यादित न राहता नगर परिषदेच्या सत्तासमीकरणावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात नगराध्यक्षांसह सत्ताधारी गटाची भूमिका, संभाव्य पक्षप्रवेश आणि त्यानंतरचे संख्याबळ याला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.

सध्या तरी १५ नगरसेवकांच्या संभाव्य पक्षप्रवेशाची चर्चा ही भूम शहराच्या राजकीय वर्तुळातील सर्वाधिक चर्चेचा विषय बनली आहे. येत्या आठवड्यात याबाबत मोठा राजकीय निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत असून, प्रत्यक्षात कोणता गट कोणत्या पक्षाच्या गोटात जातो, यावर भूम नगर परिषदेतील पुढील सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!