यशश्री अपडेट्स |तुळजापूर :
शाळेतून एकटीच घरी परतणाऱ्या एका १२ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग करत तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना तुळजापूर शहरात घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात तीव्र पडसाद उमटले असून, शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६५ वर्षीय आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत.
जब्बार मेहबूब शेख (वय ६५ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
काय घडली नेमकी घटना?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पीडित १२ वर्षांची मुलगी तुळजापूर शहरातील एका शाळेत शिक्षण घेते. ती दररोज तिच्या मैत्रिणींसोबत शाळेत ये-जा करते. मात्र, घटनेच्या दिवशी तिच्या मैत्रिणी शाळेत न आल्यामुळे ती एकटीच शाळेत गेली होती.
शाळा सुटल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ती अयोध्या नगर भागातील ‘अंबिका वॉशिंग सेंटर’च्या पाठीमागील रस्त्याने एकटीच पायी घराकडे निघाली होती. यादरम्यान अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने, पावसापासून बचाव करण्यासाठी ती एका दुकानाच्या आडोशाने छताखाली उभी राहिली.
पावसाचा फायदा घेत नराधमाचे कृत्य
मुलगी आडोशाला एकटीच उभी असल्याचे पाहून आरोपी जब्बार शेख तिथे आला. त्याने सुरुवातीला मुलीला हाताने गैर इशारे केले. त्यानंतर तिच्या जवळ जाऊन अंगाला विविध ठिकाणी अयोग्य स्पर्श करत तिचा विनयभंग केला व तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकाराने घाबरलेल्या चिमुरडीने प्रसंगावधान राखत आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि थेट घर गाठले.
घरी पोहोचल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. या घटनेमुळे धक्क्यात असलेल्या कुटुंबाने तत्काळ तुळजापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपी जब्बार मेहबूब शेख याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो – POCSO) कलम ८ आणि १२ अन्वये गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला तातडीने ताब्यात घेतले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) अन्नपूर्णा मस्के करत आहेत.
नागरिकांमधून कडक कारवाईची मागणी
भरदिवसा आणि गजबजलेल्या भागात शाळकरी मुलीसोबत असा प्रकार घडल्याने तुळजापूर शहरातील पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीवर कठोर कलमांनुसार लवकरात लवकर कारवाई करून कडक शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
