भारतीय T-20 संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा याने घेतले कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन

तुळजापूर | विशेष प्रतिनिधी भारतीय टी-20 क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज आणि नवनियुक्त उपकर्णधार तिलक वर्मा याने आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री क्षेत्र तुळजापूर येथे येऊन श्री तुळजाभवानी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. तिलक वर्माच्या या अचानक झालेल्या दौऱ्यामुळे मंदिर परिसरात क्रिकेटप्रेमी आणि भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.

मंदिर प्रशासनाकडून जंगी सत्कार

श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर संस्थानच्या वतीने तिलक वर्माचा जाहीर सत्कार करण्यात आला. धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी तिलक वर्माचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच देवीची पवित्र प्रतिमा आणि महाप्रसाद देऊन त्याला सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तिलक वर्माला त्याच्या आगामी क्रिकेट कारकिर्दीसाठी आणि भारतीय संघाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी विशेष शुभेच्छा दिल्या.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी विधानपरिषदेचे आमदार विक्रम काकडे यांनीही उपस्थित राहून तिलक वर्माचे स्वागत केले. यासोबतच मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, मंदिर संस्थानचे इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, पुजारी बांधव आणि सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रिकेटप्रेमींचा उत्साह आणि पोलिसांची धावपळ

भारतीय संघाचा स्टार खेळाडू आपल्या शहरात आल्याचे समजताच तुळजापूर आणि परिसरातील क्रिकेटप्रेमींनी कुलस्वामिनीच्या दर्शन रांगेत आणि मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. तिलक वर्माला पाहण्यासाठी आणि त्याचे फोटो मोबाईलमध्ये टिपण्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून आली. भाविक आणि चाहत्यांनी ‘भारताचा स्टार’ म्हणून तिलकचे उत्स्फूर्त स्वागत केले.

देवीचे दर्शन घेतल्यानंतर तिलक वर्मानेही हात उंचावून उपस्थित चाहत्यांना दाद दिली आणि सर्वांचे आभार मानले. देवीच्या आशीर्वादाने आगामी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी अधिक उंचावेल, असा विश्वास यावेळी चाहत्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

error: Content is protected !!