यशश्री अपडेट्स | भूम
भूम शहरात दुधातील भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. शहरातील इंदिरानगर परिसरातील ‘मधुबन ट्रेडिंग कंपनी’वर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर ‘व्हे पावडर’ आणि ‘व्हे परमीएट पावडर’चा साठा जप्त करण्यात आला आहे. दुधाची गुणवत्ता खराब करून मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने भूम पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि दूध व्यावसायिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमकी कारवाई काय?
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, भूम शहरातील इंदिरानगर भागात असलेल्या ‘मधुबन ट्रेडिंग कंपनी’च्या गोदामावर अचानक छापा टाकण्यात आला. या तपासणी दरम्यान पथकाला विविध नामांकित ६ ब्रँड्सच्या एकूण ६१ गोण्या व्हे पावडर आणि व्हे परमीएट पावडरचा बेकायदेशीर साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या प्रत्येक गोणीचे वजन सुमारे २५ किलो इतके आहे. हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारपेठेतील किंमत मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे.
अकलूज कनेक्शन उघडकीस
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाईदरम्यान गोदामातील मालाच्या खरेदी-विक्रीच्या बिलांची कसून तपासणी केली. या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. हा संपूर्ण संशयास्पद साठा अकलूज (टेकेवाडा) येथील ‘हेमंत कॉर्पोरेशन’ कडून खरेदी करण्यात आला होता. हा साठा स्थानिक दूध विक्रेते, दूध संकलन केंद्रे (डेअरी) आणि दूध शीतकरण (चिलिंग सेंटर्स) केंद्रांना पुरवून दुधात मोठ्या प्रमाणावर भेसळ करण्याच्या उद्देशानेच साठवून ठेवण्यात आला होता, असा थेट आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या ७ जणांवर गुन्हे दाखल
अन्न सुरक्षा अधिकारी रोहित दिनेश फंदी यांनी दिलेल्या अधिकृत फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात खालील आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
१. बाळासाहेब मधुकर गोडगे (प्रोप्रायटर, मधुबन ट्रेडिंग कंपनी) २. हेमंत टेके (हेमंत कॉर्पोरेशन, अकलूज) ३. धर्मराज शिंदे ४. गजानन कांबळे ५. काकासाहेब डोम्बले ६. टेम्बाई दूध संकलन केंद्राशी संबंधित व्यक्ती ७. ईबरी दूध संकलन केंद्राशी संबंधित व्यक्ती व इतर
गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंद: या प्रकरणात आरोपींवर नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३(५), ६१, १११, २७४ आणि २७५ सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील विविध कडक नियमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुढील तपास सुरू
दुधासारख्या जीवनावश्यक घटकात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने घेतलेल्या या कठोर भूमिकेचे नागरिकांमधून स्वागत होत आहे. या मोठ्या कारवाईमुळे भूम तालुक्यातील दूध डेअरी चालकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास भूम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जांभळे करत असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा समावेश आहे आणि हा साठा आणखी कुठे पुरवला गेला, याचा शोध घेतला जात आहे. तपासाअंती आणखी काही मोठी नावे समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
