
सरकारचा कडक पवित्रा; जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांची स्पष्ट भूमिका
एसईबीसी किंवा कुणबी यापैकी एकाच पर्यायाची निवड करावी लागणार; जरांगे पाटील यांचे उपोषण तेराव्या दिवशीही सुरू
यशश्री अपडेट्स | जालना
मराठा समाजातील पात्र नागरिकांना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेबाबत जालना जिल्हा प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कुणबी प्रमाणपत्रासाठी केवळ अर्ज केल्याने प्रमाणपत्र मिळणार नसून, संबंधित अर्जदाराला आवश्यक कागदपत्रे सादर करून आपली वंशावळ आणि जातीय नोंदीतील संबंध सिद्ध करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी मित्तल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत प्रशासनाची भूमिका मांडली. कायदेशीर प्रक्रिया आणि शासनाच्या नियमांनुसार योग्य पुरावे तपासल्यानंतरच जात प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना उपलब्ध असलेले आवश्यक पुरावे, जुन्या नोंदी आणि वंशावळीसंबंधी कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अर्ज केल्याने थेट प्रमाणपत्र नाही
कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सरसकट प्रमाणपत्र दिले जाईल, अशी भूमिका नसल्याचे जिल्हाधिकारी मित्तल यांनी स्पष्ट केले. अर्जदाराने आपल्या दाव्याला आधार देणारे पुरावे सादर करणे आवश्यक आहे. विशेषतः वंशावळ सिद्ध करणे आणि संबंधित नोंदींची पडताळणी करणे महत्त्वाचे राहणार आहे.
यामुळे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांनी घाई न करता उपलब्ध असलेली जुनी कागदपत्रे, महसूल नोंदी, शैक्षणिक अथवा अन्य अधिकृत नोंदी यांची माहिती घेऊन प्रशासनाकडे अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
एसईबीसी की कुणबी? एकाच पर्यायाची निवड
जात प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत अर्जदाराला एसईबीसी किंवा कुणबी यापैकी एका पर्यायाची निवड करावी लागणार असल्याचेही जिल्हाधिकारी मित्तल यांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही पर्यायांचा एकाच वेळी लाभ घेण्याचा प्रयत्न करता येणार नाही.
या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रमाणपत्र देताना नियमांचे पालन, कागदपत्रांची तपासणी आणि वंशावळीची पडताळणी यावर प्रशासनाकडून विशेष भर दिला जाणार आहे.
जरांगे यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची माहिती
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विविध मागण्या उपस्थित केल्यानंतर जालना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीची आणि जात प्रमाणपत्र प्रक्रियेची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
राज्य शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या १५ मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मित्तल यांनी केले.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या आरोग्याची नियमित तपासणी आणि आवश्यक उपचारांसाठी वैद्यकीय पथक चोवीस तास कार्यरत असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
‘ही शिबिरे केवळ आंदोलनापुरती आहेत का?’ —मनोज जरांगे पाटील
दरम्यान, वडीगोद्री आणि अंतरवाली सराटी परिसरात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या जात प्रमाणपत्र शिबिरांबाबत प्रश्न उपस्थित केला.

जात प्रमाणपत्रासाठी राबविण्यात येणारी शिबिरे केवळ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घेतली जात आहेत की त्यामागे आणखी काही उद्देश आहे, असा सवाल त्यांनी केला. मिळालेली जात प्रमाणपत्रे रद्द करण्याच्या उद्देशाने काही जणांच्या सल्ल्याने ही शिबिरे आयोजित केली जात आहेत का, हेही पाहावे लागेल, असे जरांगे यांनी म्हटले.
‘१२ तारखेला आरपार आंदोलनाची दिशा ठरणार’
सरकारने शिष्टमंडळ पाठवायचे की नाही, हा निर्णय सरकारने घ्यावा. आपण कोणाची वाट पाहत बसलेलो नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली.
ठरल्याप्रमाणे मुंबईकडे जाण्याची तयारी सुरू असून १२ सप्टेंबरला आरपार आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हे दाखल झाले तरी समाजाने मागे हटू नये, असे आवाहनही त्यांनी समर्थकांना केले.
आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ५० टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा पुढे गेलेल्या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, तसेच १९९४ मध्ये देण्यात आलेल्या आरक्षणाच्या निर्णयावरही चर्चा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी बबन तायवाडे यांच्या भूमिकेवरही टीका केली.
‘जरांगे माझे भाऊ’; अमृता फडणवीस यांचे निमंत्रण
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील हे आपले भाऊ असल्याचे सांगत त्यांना घरी जेवणासाठी येण्याचे निमंत्रण दिले.
या निमंत्रणावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील यांनी सध्या आपण आंदोलनाच्या मैदानात असल्याचे सांगितले. ताईंनी मायेची भावना आपल्या बाजूने ठेवावी. भाऊबीजेच्या वेळी आपण साडी-चोळी घेऊन जाऊ, असे त्यांनी मिश्कीलपणे म्हटले.
‘शिकारीच्या वेळेला जेवण्याची वेळ नसते; आज भाऊ संकटात आहे,’ अशा शब्दांत जरांगे यांनी सध्याच्या आंदोलनाच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले.
पुढील काही दिवस महत्त्वाचे
एकीकडे प्रशासनाकडून कुणबी प्रमाणपत्रासाठी पुरावे आणि वंशावळ सिद्ध करण्याची आवश्यकता स्पष्ट करण्यात आली आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र, मराठा आरक्षण आणि शासनाच्या निर्णयांबाबत पुढील काही दिवसांत काय घडामोडी होतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
