चर्चा करूनच निर्णय घेणार; उच्च न्यायालयात न्याय मिळेल : ओमराजे निंबाळकर”हत्या केली तरी विरोधक संपत नसतो, तो अधिक ताकदीने उभा राहतो”


यशश्री अपडेट्स : धाराशिव | प्रतिनिधी
कै. पवनराजे निंबाळकर व समद काझी हत्याकांड प्रकरणातील निकालानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी राजकीय भूमिका सर्वांशी चर्चा करूनच ठरविणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
“३ जून २००६ रोजी कै. पवनराजे आणि समद काझी यांची निर्घृण हत्या झाली. त्या दिवसापासून आम्ही न्यायासाठी संघर्ष करत आहोत. राज्य पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याने आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. मात्र, २० जून रोजी आलेल्या निकालात न्यायालयाने राजकीय वैमनस्य आणि हत्येचा उद्देश मान्य केला, तरीही सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यामुळे पवनराजे यांची हत्या नेमकी कोणी केली, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे,” असे ओमराजे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “निकालातील त्रुटी उच्च न्यायालयासमोर मांडणार असून, गेली २० वर्षे ज्या न्यायासाठी लढत आहोत, तो न्याय उच्च न्यायालयातून मिळेल, अशी अपेक्षा आहे. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती नसल्याचे दुःख आणि हाल आम्ही दररोज अनुभवत आहोत.”
राजकीय भूमिकेबाबत बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, “ज्या कारणासाठी हत्या करण्यात आली, तो हेतू कधीही सफल होऊ देणार नाही. राजकीय विरोधकाची हत्या केली म्हणून तो संपत नसतो, तर तो नव्या स्वरूपात पुन्हा उभा राहतो. त्यामुळेच मी राजकारणात आलो.”
सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, “मी काय काम करतो, हे जनतेने पाहिले आहे. सोशल मीडियावर अनेक चुकीच्या चर्चा सुरू आहेत. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेची मते जाणून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.”
दरम्यान, धाराशिव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी तालुकानिहाय संवाद साधण्यासाठी बैठकींचे आयोजन करण्यात आले. बैठकीपूर्वी ओमराजे निंबाळकर आणि डॉ. जयप्रकाश निंबाळकर यांनी कै. पवनराजे यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेत आशीर्वाद घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *