धाराशिव हादरलं! विवाहितेवर लैंगिक अत्याचार; पतीला चाकूचा धाक, दोघे अटकेत


यशश्री अपडेट्स : धाराशिव – (प्रतिनिधी)
धाराशिव शहरात एका 19 वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे.
विजय राठोड, संदेश जाधव आणि पृथ्वीराज अण्णा बनसोडे अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी विजय राठोड आणि संदेश जाधव यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा पती 22 जून रोजी रात्री एका हॉटेलमधील खोलीत जात असताना तिघा आरोपींनी त्यांना अडवले. आरोपींनी महिलेच्या पतीला चाकूचा धाक दाखवत जागेवरच थांबवून ठेवले व जिवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर आरोपींपैकी एकाने महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या पतीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, उर्वरित दोन्ही आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पीडित दाम्पत्याने याबाबत धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64(1), 126, 127, 118(1), 324(4), 351(2), 351(3), 352, 3(5) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास धाराशिव शहर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *