पवनराजे हत्याकांडाची केस पुन्हा उघडा; सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी – आमदार रोहित पवार

यशश्री अपडेट्स : धाराशिव | प्रतिनिधी

कै. पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातील माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असली, तरी या हत्येतील खरे मारेकरी कोण हे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा उघडून सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी केली.

धाराशिव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, रोहित बागल, अविनाश जाधव, योगेश सोनणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार पवार म्हणाले की, “पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा तपास 20 वर्षांनंतरही लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा पुन्हा खोलात जाऊन तपास होणे आवश्यक आहे. सीआयडी आणि सीबीआय या यंत्रणा अनेकदा दबावाखाली काम करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली व्हावी, असे माझे मत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर हे सध्या सत्तेत असून त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून वडिलांना न्याय मिळवून द्यावा.”

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. “पाटील आणि निंबाळकर या दोन कुटुंबांमधील राजकीय वादामुळे जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होत आहे. त्यामुळे मतदारांना पर्याय मिळणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचीही ‘बी टीम’ नाही. नगर परिषद निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळाले असून ‘बी टीम’च्या आरोपांबाबत पुढील काळात आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल,” असे ते म्हणाले.

शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना आमदार पवार यांनी सरकारवर टीका केली. “सरकारने कर्जमाफीसाठी अध्यादेश काढला असला, तरी त्यातील अटी अत्यंत जाचक आहेत. योजनेला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याचा आनंद आहे, मात्र शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अटी योग्य नाहीत. त्या अटी रद्द करण्याची मागणी करत आम्ही अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारने मागण्या योग्य असल्याचे मान्य केले, मात्र दिलेला शब्द पाळला गेला नाही,” असा आरोप त्यांनी केला.

“30 जूनपासून कर्जमाफी लागू होणार असल्याने त्यापूर्वी जाचक अटींमध्ये बदल करण्यासाठी 29 जून रोजी आंदोलन करण्यात येणार आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *