यशश्री अपडेट्स | धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षामध्ये सुरू असलेला जुना-नवा वाद थांबण्याची चिन्हे अद्याप दिसत नसून, या वादाला आता आणखी एक नवे वळण मिळाले आहे. भाजपचे नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून पक्षातील महत्त्वाकांक्षा, निष्ठा आणि संघटन बांधणीच्या मुद्द्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत पक्षातील काही नेत्यांना टोला लगावला आहे.
“विस्ताराला मर्यादा नसते, परंतु महत्त्वाकांक्षा संतुलित असावी लागते. भाजपा परिवाराची पार्टी नाही, पार्टी हाच आमचा परिवार! जय भाजपा… तय भाजपा…” अशा आशयाची पोस्ट ठाकूर यांनी केली असून, ती सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
वादाची पार्श्वभूमी
प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या भेटीपासून रोखल्याचा आरोप झाल्यानंतर हा अंतर्गत वाद उफाळून आला. या घटनेनंतर ॲड. अनिल काळे, माजी जिल्हाध्यक्ष संताजी काका चालुक्य, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड आणि रामदास कोळगे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
यानंतर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी व जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी प्रतिउत्तर देत निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी मागील ३० वर्षांत भाजपच्या संघटन वाढीसाठी नेमके काय योगदान दिले, याचे उदाहरणांसह स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान ठाकूर यांच्यासह इतर नेत्यांना दिले होते.
अर्चना पाटील यांनी काय म्हटले?
अर्चना पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेत, “तुमच्या कार्यकाळात तुमच्या नेतृत्वाखाली कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपची सत्ता होती का? केवळ हेतूपुरस्सर आरोप करून पक्षात संभ्रम निर्माण करू नये. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वामुळे भाजपला सत्तेच्या संधी मिळाल्या,” असा दावा केला होता.
मा. आ.सुजितसिंह ठाकूर यांचे प्रत्युत्तर
या वक्तव्याला उत्तर देताना सुजितसिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या योगदानाचा मुद्दा पुढे केला. त्यांनी म्हटले की, “३० वर्षे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी काय केले, असा प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी स्वतःचा राजकीय प्रवास आठवावा. ज्या कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करून भाजप गावागावात पोहोचवला, त्याच कार्यकर्त्यांच्या बळावर अनेकांना स्वतःचा पक्ष सोडून भाजपमध्ये यावे लागले. भाजपमध्ये येण्याची वेळ तुमच्यावर आली, हेच त्या कार्यकर्त्यांच्या संघर्षाचे आणि निष्ठेचे सर्वात मोठे उत्तर आहे.”
त्यांनी पुढे म्हटले की, “संघर्ष केलेल्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांच्या त्यागाचा सन्मान करायला हवा. पक्षाची पायाभरणी करणारे कार्यकर्ते नसते, तर आज भाजपमध्ये येण्याची संधीही निर्माण झाली नसती.”
सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
ठाकूर यांनी आपल्या पोस्टमध्ये थेट कोणाचे नाव घेतले नसले, तरी ती पोस्ट अर्चना पाटील यांच्या वक्तव्याला उत्तर म्हणूनच पाहिली जात आहे. विशेष म्हणजे, “पार्टी हाच आमचा परिवार” हा संदेश देत त्यांनी पक्ष संघटना व्यक्तीपेक्षा मोठी असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपमधील गटबाजी पुन्हा ऐरणीवर
धाराशिव भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून निष्ठावंत आणि नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांमध्ये सुरू असलेला वाद अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे संघटन उभारणीत जुन्या कार्यकर्त्यांचे योगदान मांडले जात आहे, तर दुसरीकडे सत्तेच्या राजकारणात नव्या नेतृत्वाची भूमिका अधोरेखित केली जात आहे.
या शाब्दिक चकमकीमुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादाचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
