ठरलं, निर्णय झाला; फक्त घोषणेची प्रतीक्षा! ओमराजे निंबाळकर शिंदे गटाच्या वाटेवर?”

यशश्री अपडेट्स : धाराशिव – प्रतिनिधी
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे लवकरच उबाठा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांशी झालेल्या संवादात ओमराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, “निर्णय झाला आहे, आता केवळ घोषणेची प्रतीक्षा आहे,” असे संकेत दिल्याचे समजते.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ओमराजे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या, मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. “सत्तेची आणि आर्थिक ताकद विरोधकांसोबत आहे. आपण ज्यांना विरोध करण्यासाठी राजकारणात आलो, ते कोणत्याही सत्तेत कायम प्रभावी राहिले. मर्यादित संसाधनांमध्ये किती काळ लढायचे, याचाही विचार करावा लागेल,” असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या साध्या कामांसाठीही निधी मिळत नाही. दरवर्षी अंदाजपत्रके तयार होतात, पण निधी उपलब्ध होत नाही. विरोधक सत्तेत असल्याने विकासकामांना गती मिळते, तर आपल्या कार्यकर्त्यांची बिलेही अडवली जात आहेत. त्यामुळे सत्तेतील नेतृत्व स्वीकारण्याचा विचार करावा लागणार आहे.”
कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालावर भाष्य करताना ओमराजे म्हणाले, “२० वर्षांनंतरही कोणताही आरोपी दोषी ठरला नाही. न्यायालयाने राजकीय वैमनस्य आणि हेतू मान्य केला, मात्र सर्व आरोपी निर्दोष ठरले. मी खासदार असताना माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ शकलो नाही, ही खंत आहे.”
राजकीय निर्णयाबाबत कार्यकर्त्यांना आवाहन करताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “मी जो निर्णय घेईन, त्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. आगामी काळात जिल्हा परिषद, नगर परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचा विचार करता संघटनेला बळकटी देणे आवश्यक आहे.”
तसेच विरोधकांशी तडजोड होणार नसल्याचे स्पष्ट करताना ओमराजे म्हणाले, “अनेकजण विचारतात की, मी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार का? पण मी मांडीला मांडी नाही, तर त्यांच्या उरावर बसणार आहे. माझी भूमिका कधीही तडजोडीची राहणार नाही. त्या कुटुंबासाठी मी मत मागणार नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *