वर्धापन दिनी शिवसेनेचा आदर्श उपक्रम; गरजू बालकाच्या उपचारासाठी मदतीचा हात

यशश्री अपडेट्स : तुळजापूर प्रतिनिधी

तुळजापूर : शिवसेना पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असताना तुळजापूर तालुका व शहर शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जपत एक प्रेरणादायी उपक्रम राबविला. अनावश्यक खर्च, बॅनरबाजी आणि दिखाऊ कार्यक्रमांना फाटा देत “आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून बोन मॅरोच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या एका चिमुकल्याच्या उपचारासाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

तुळजापूर शहरातील शेळके कुटुंबातील एका लहान बालकाला बोन मॅरोचा गंभीर आजार असून त्याच्या उपचारासाठी सुमारे ४० लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत असलेल्या या कुटुंबाची माहिती मिळताच शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी तत्काळ पुढाकार घेतला.

शिवसेना पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त होणारा खर्च टाळून पक्षाच्या वतीने त्या चिमुकल्याच्या उपचारासाठी २५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी बोलताना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी, “फूल नाही तर फुलाची पाकळी” या भावनेतून ही मदत करण्यात आल्याचे सांगितले. तसेच केवळ आर्थिक मदत देऊन थांबणार नसून, त्या बाळाचे उपचार पूर्ण होईपर्यंत शिवसेना शेळके कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या प्रसंगी उपस्थित शिवसैनिकांनी चिमुकल्याला लवकरात लवकर योग्य उपचार मिळून तो निरोगी आयुष्य जगावा, अशी प्रार्थना व्यक्त केली. उपचाराच्या प्रवासात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी शिवसेना पक्ष कटिबद्ध राहील, असा विश्वासही शेळके कुटुंबीयांना देण्यात आला.

आजच्या राजकीय वातावरणात वर्धापन दिन म्हणजे मोठमोठे बॅनर, जाहिराती आणि कार्यक्रम अशी प्रथा रूढ झाली असताना तुळजापूर शिवसेनेने एका आजारी बालकाच्या मदतीला धावून जात सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. या उपक्रमामुळे शेळके कुटुंबीयांच्या डोळ्यांत आशेचा किरण निर्माण झाला असून परिसरातूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे.

यावेळी तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव, उपतालुकाप्रमुख विकास जाधव, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते, शहरप्रमुख बापूसाहेब भोसले, शहर संघटक नितीन मस्के, संजय लोंढे, संभाजी नेपते, गौरव साळुंखे तसेच शेळके कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

“वर्धापन दिन साजरा करण्यापेक्षा एका जीवाला आधार देणे अधिक महत्त्वाचे” हा संदेश देणारा हा उपक्रम तुळजापूरकरांच्या मनाला स्पर्श करून गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *