माफीचा साक्षीदार पारसमल जैनच्या कथनावर न्यायालयाचा अविश्वास; तपास प्रक्रियेवरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह
यशश्री अपडेट्स : धाराशिव (प्रतिनिधी)
कै. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे वाहनचालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात तब्बल दोन दशकांनंतर मुंबईतील विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी हा निकाल दिला.
या निकालामुळे राज्यभर चर्चेला उधाण आले असून, “पवनराजे यांची हत्या नेमकी कोणी आणि का केली?” हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच राहिला आहे. निकालामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून, पुढील काळात ते कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निकालाच्या दिवशी न्यायालयाने सर्व आरोपींना हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपी न्यायालयात उपस्थित होते. आरोपी महात्मा उर्फ पिंटू सिंह चौधरी उशिरा पोहोचल्याने सुनावणीला काही काळ विलंब झाला. डॉ. पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील, पृथ्वीराज पाटील, तसेच मल्हार आणि मेघ पाटील हे न्यायालयात उपस्थित होते. तर पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी, खासदार ओमराजे निंबाळकर, डॉ. जयप्रकाश राजे तसेच समद काझी यांच्या कुटुंबीयांनीही उपस्थिती लावली.
मागील सुनावणीवेळी १६ जून रोजी निकाल देता न आल्याबद्दल न्यायालयाने दिलगिरी व्यक्त केली. तसेच आरोपी, फिर्यादी, सरकारी पक्षाचे वकील आणि तपास यंत्रणांचेही आभार मानले. न्यायालयाने नमूद केले की, या प्रकरणात तब्बल १२७ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. सुरुवातीला कळंबोली पोलिसांनी तपास केला, त्यानंतर हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला.
माफीच्या साक्षीदारावर न्यायालयाचा अविश्वास
या संपूर्ण खटल्याचा आधार माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या जबाबावर होता. मात्र, जैनच्या जबाबामध्ये अनेक विसंगती आढळून आल्याने न्यायालयाने त्याच्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. माफीचा साक्षीदार म्हणून त्याचा पहिला जबाब कायदेशीर प्रक्रियेनुसार नोंदविला गेला नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच पहिला आणि दुसरा जबाब परस्परविरोधी असल्याने तो ग्राह्य धरता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
न्यायालयाने तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जैनचा मोबाईल जप्त न करणे, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) न मिळविणे, त्याच्या कथनाला पूरक पुरावे न सादर करणे, तसेच अनेक बाबींमध्ये पुराव्यांचा अभाव असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.
तपासातील त्रुटींवर न्यायालयाचे ताशेरे
न्यायालयाने नमूद केले की, जैनने इंद्रप्रस्थ रेस्ट हाऊसमध्ये थांबल्याचा दावा केला असला, तरी त्यासंदर्भातील कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आला नाही. तसेच बिहार दौरा, शस्त्र खरेदी, आर्थिक व्यवहार, वाहन खरेदी, टेलिफोन कॉल्स आणि आरोपींच्या हालचालींबाबतही ठोस पुरावे सादर करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला.
जैनने दिलेल्या विविध कथनांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचे न्यायालयाने नमूद करत, “तो सतत जबाब बदलत होता, त्यामुळे त्याची साक्ष विश्वासार्ह ठरत नाही,” असे निरीक्षण नोंदविले.
न्यायालयाने असेही नमूद केले की, डॉ. पद्मसिंह पाटील आणि कै. पवनराजे निंबाळकर यांच्यात राजकीय वैर आणि धुसफूस होती, मात्र केवळ राजकीय वैर हे दोष सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही.
या आरोपींची निर्दोष मुक्तता
न्यायालयाने डॉ. पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, दिनेश तिवारी, महात्मा उर्फ पिंटू सिंह चौधरी, कैलास यादव, ग्यानेंद्र उर्फ छोटे पांडे, शशिकांत कुलकर्णी तसेच माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, १२०(ब) तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३, २५ आणि २७ अंतर्गत असलेल्या आरोपांतून निर्दोष मुक्त केले.
(टीप : वरील वृत्त न्यायालयाच्या निकालावर आधारित आहे.)
