ओमराजेंच्या संभाव्य पक्षांतराने जिल्ह्यात खळबळ; 20 जूननंतर चित्र स्पष्ट?

यशश्री अपडेट्स | धाराशिव

धाराशिवच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडी घडत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 20 जूननंतर ते आपल्या राजकीय भूमिकेबाबत अधिकृत घोषणा करू शकतात, अशी माहिती विविध स्तरांवरून समोर येत असून, यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

मागील दोन दिवसांपासून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह शिवसेना (उबाठा) पक्षातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. संभाव्य गटामध्ये संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर यांची नावेही चर्चेत आहेत.

दरम्यान, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांशी कायम संपर्कात राहणारे खासदार ओमराजे निंबाळकर गेल्या काही दिवसांपासून संपर्काबाहेर असल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या मुलाच्या प्रकृतीमुळे पुण्यात असल्याची माहिती दिली होती. मात्र त्यानंतर झालेल्या काही महत्त्वाच्या पक्षीय बैठकींना त्यांची अनुपस्थिती आणि सोशल मीडियावरील शांतता यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून पक्षांतराची चर्चा

खासदार ओमराजे निंबाळकर आणि राज्याचे मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील सुसंवाद नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. प्रशासकीय बैठकीत दोघांमध्ये कधीही उघड मतभेद दिसून आले नाहीत. काही वर्षांपासून ओमराजे यांना शिंदे शिवसेनेत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. सध्याच्या घडामोडींमध्येही सरनाईक यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे.

सोशल मीडियावर चर्चांचा पूर

संभाव्य पक्षांतराच्या चर्चांमुळे बुधवारी दिवसभर धाराशिव जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते. सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेप्रती व्यक्त केलेली निष्ठा दर्शवणारी जुनी भाषणे पुन्हा व्हायरल झाली. काही कट्टर शिवसैनिकांनी संभाव्य पक्षांतराबाबत नाराजीही व्यक्त केली.

पवनराजे हत्याकांडाच्या निकालाकडेही लक्ष

खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील स्वर्गीय पवनराजे निंबाळकर यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल 16 जून रोजी अपेक्षित होता. मात्र न्यायालयाने निकालाची तारीख 20 जूनपर्यंत पुढे ढकलल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. राजकीय घडामोडी आणि या खटल्याचा थेट संबंध नसला तरी दोन्ही घटना एकाच कालावधीत घडत असल्याने चर्चांना अधिक उधाण आले आहे.

दोन्ही आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबतच

दरम्यान, धाराशिवचे आमदार कैलास पाटील आणि उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी आपण उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे खासदार ओमराजे यांनी वेगळी भूमिका घेतल्यास जिल्ह्यातील शिवसेना संघटनात्मकदृष्ट्या दोन गटांत विभागली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

धाराशिव नगरपालिकेतील काही नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारी अद्याप प्रतीक्षेच्या भूमिकेत असल्याचे समजते. अनेकांनी याबाबत भूमिका जाहीर करण्यास टाळाटाळ केली असून, मोठा कार्यकर्ता वर्ग अद्याप अधिकृत घोषणेची वाट पाहत आहे.

बदलणार का धाराशिवचे राजकीय समीकरण?

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रत्यक्षात शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यास धाराशिव जिल्ह्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत प्रभावी नेतृत्व म्हणून उदयास आलेले ओमराजे हे जिल्ह्यातील प्रमुख राजकीय केंद्र मानले जातात.

त्यांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आहेत. सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश झाल्यास जिल्ह्यातील राजकीय समीकरणे नव्याने मांडली जाऊ शकतात. पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांची साथ मिळाल्यास शिंदे शिवसेनेची ताकद जिल्ह्यात आणखी वाढू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मात्र, अद्याप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसल्याने सर्वांचे लक्ष 20 जूननंतरच्या त्यांच्या निर्णयाकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *