विद्यार्थ्यांना खाऊ व पुस्तकांचे वाटप; पर्यावरण संवर्धनासाठी ९० झाडे लावण्याचा संकल्प
यशश्री अपडेट्स | धाराशिव
ज्येष्ठ समाजसेवक Anna Hazare यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त लोक आंदोलन न्यासच्या वतीने सारोळा बु. येथे विविध सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच शिक्षक व पालकांना अण्णा हजारे यांच्या कार्यावर आधारित पुस्तके भेट देण्यात आली.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पेरू, आवळा, जांभूळ, चिंच, हादगा, कडुलिंब, करंजी, पिंपळ आदी विविध प्रकारची ९० झाडे वाटप करण्यात आली. यावेळी “९० व्या वाढदिवसानिमित्त ९० झाडे लावण्याचा संकल्प” करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमास मुख्याध्यापक होनकळस सर, पंचायत समिती सदस्य प्रशांत रणदिवे, पत्रकार मनोज जाधव, शालेय समिती अध्यक्ष नामदेव खरे, उपाध्यक्ष बालाजी मसे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सचिन जासूद, लोक आंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष मनोज खरे यांच्यासह अनेक मान्यवर, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यशस्वी ठरला.

