परंड्याच्या सुपुत्राचा जागतिक स्तरावर डंका! प्रा. डॉ. गजानन राशीनकर यांचा जगातील टॉप 5% शास्त्रज्ञांमध्ये समावेश

यशश्री अपडेट्स-परंडा | प्रतिनिधी

परंडा शहराचे सुपुत्र तथा शिवाजी विद्यापीठातील आघाडीचे संशोधक आणि रसायनशास्त्रज्ञ प्रा. डॉ. गजानन शंकरराव राशीनकर यांचा जगातील टॉप 5 टक्के शास्त्रज्ञांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे परंडा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या अभिमानास्पद कामगिरीबद्दल भाजपा नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून प्रा. डॉ. राशीनकर यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रा. डॉ. राशीनकर हे शिवाजी विद्यापीठात संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांचे वडील स्व. शंकरराव राशीनकर हे भूविकास बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक होते, तर मातोश्री स्व. उमाबाई वडेकर या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे ते युवकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.

स्तनाच्या कर्करोगावरील संशोधनाला भारतीय व युके पेटंट

महिलांच्या स्तनाच्या कर्करोगावरील ‘हायपरथर्मिया – चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती’ या संशोधनासाठी प्रा. डॉ. राशीनकर यांना भारतीय तसेच युनायटेड किंगडम (यूके) पेटंट प्राप्त झाले आहे. या संशोधनामुळे शस्त्रक्रिया किंवा जखम न करता उपचार करणे शक्य होणार असून, किमोथेरपीमुळे होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांपासून रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

नॅनो-मेडिसिन क्षेत्रात त्यांनी केलेले संशोधन क्रांतिकारी मानले जात असून, पर्यावरणपूरक पद्धतीने नवीन रासायनिक संयुगांची निर्मिती, कॅन्सरविरोधी संयुगे आणि जैविकदृष्ट्या सक्रिय रेणूंचे संश्लेषण या विषयांवरही त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य आहे.

प्रा. डॉ. गजानन राशीनकर यांचे संशोधन कार्य हे परंडा तालुक्यासाठी अभिमानास्पद असून युवकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या जागतिक यशाबद्दल परंडा येथे लवकरच भव्य सत्कार आणि सन्मान सोहळा आयोजित करण्याचा मानस माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *