बार्शीतील व्यापाऱ्याला सायबर धक्का; ५० लाखांची ऑनलाईन फसवणूक

यशश्री अपडेट्स-बार्शी(प्रतिनिधी):डिजिटल युगात एका ‘क्लिक’ची किंमत किती मोठी असते, याचा प्रत्यय बार्शीतील कापड व्यापाऱ्याला आला. घाईत झालेल्या चुकीमुळे व्यापाऱ्याच्या खात्यातून ५० लाख रुपये ट्रान्सफर झाले आणि परत मिळवण्यासाठी आता पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

पटेल चौक परिसरात कापड व्यवसाय करणारे अमीत राजेंद्र कटारिया यांना ७ जून २०२६ रोजी त्यांचे मित्र सुशांत शहाणे यांचा फोन आला. मित्राने ५ लाख रुपये उसणे मागितले. कटारिया यांनी आयसीआयसीआय बँकेच्या नेट बँकिंगमधून रामभाऊ सुनिल मोरे, रा. साकत ता. बार्शी, सध्या रा. गोवा याच्या खात्यावर पैसे पाठवायचे ठरवले.

पण घाई आणि नजरचुकीमुळे ५ लाखांऐवजी थेट ५० लाख रुपये ट्रान्सफर झाले.

दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट तपासताना चूक लक्षात आली. कटारिया यांनी तातडीने रामभाऊ मोरे यांना संपर्क केला. सुरुवातीला मोरेने ४५ लाख रुपये चेकने परत देण्याचं आश्वासन दिलं. नंतर मात्र “बँकिंग तांत्रिक अडचण” सांगून टाळाटाळ सुरू केली.

फसवणूक झाली हे लक्षात येताच अमीत कटारिया यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी रामभाऊ सुनिल मोरे याच्याविरुद्ध BNS कलम ३१४ विश्वासघात, ३१६(२) आणि ३१८(४) फसवणूक अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बालाजी कुकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *