बोगस डॉक्टरच्या उपचारानंतर शेतकऱ्याचा मृत्यू?; बार्शीत गुन्हा दाखल

यशश्री अपडेट्स | बार्शी प्रतिनिधी
बार्शी तालुक्यातील उपळाई (ठों.) येथे वैद्यकीय परवाना व शैक्षणिक पात्रता नसतानाही उपचार करणाऱ्या कथित बोगस डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याप्रकरणी मृताच्या मुलाने संबंधिताविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी गोविंद तानाजी सुतार (वय २८, रा. विश्वासनगर, उपळाई ठों.) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील तानाजी नरहरी सुतार (वय ६०) यांना शेतातील कामामुळे कंबरेत वेदना होत असल्याने २६ एप्रिल २०२६ रोजी रात्री गावातील शंकर मनोहर पाठक यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले होते.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधिताने कंबरेत इंजेक्शन देऊन औषधे दिली. मात्र दुसऱ्याच दिवशी इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी गाठ निर्माण झाली. सुरुवातीला बर्फाने शेकण्याचा सल्ला देण्यात आला, परंतु गाठ कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत गेली.
यानंतर २ मे रोजी तानाजी सुतार यांना बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तपासणीनंतर गाठ गंभीर स्वरूपाची असल्याचे निदर्शनास आल्याने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. मात्र उपचार सुरू असतानाच ४ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी वैद्यकीय कागदपत्रे व शवविच्छेदन अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
फिर्यादी गोविंद सुतार यांनी आरोप केला आहे की, शंकर पाठक यांच्याकडे कोणतीही मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी, प्रशिक्षण अथवा उपचाराचा अधिकृत परवाना नसतानाही ते अनेक वर्षांपासून गावात रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे गंभीर संसर्ग होऊन गाठ निर्माण झाली आणि त्यातूनच वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. वैद्यकीय अभिप्राय व तपास अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
 महत्त्वाची नोंद : सदर प्रकरणातील आरोप फिर्यादीने केले असून, तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित आरोपी दोषी असल्याचे सिद्ध झालेले नाही. पोलीस तपास व वैद्यकीय अहवालानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *