यशश्री अपडेट्स | सोलापूर |प्रतिनिधी|
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, शेअर बाजारातील मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे एका मुख्याध्यापकाने पत्नी व दोन लहान मुलांसह जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मृतांमध्ये मुख्याध्यापक योगेश पाटील, त्यांची पत्नी माधुरी पाटील, तसेच मुले अथर्व आणि शिवांश यांचा समावेश आहे.
योगेश पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शाळांना सुट्टी असल्याने ते कुटुंबासह मूळ गावी हत्तीज येथे आले होते. दरम्यान, त्यांनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. मात्र सातत्याने झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे त्यांच्यावर तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयांचे कर्ज झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्ज फेडण्यासाठी त्यांनी नातेवाइकांकडूनही मोठ्या प्रमाणात पैसे उधार घेतले होते. मात्र आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट होत गेल्याने आणि कर्जदारांच्या वसुलीच्या तगाद्यामुळे ते तीव्र मानसिक तणावाखाली होते.
या विवंचनेतून त्यांनी प्रथम पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांना विष दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची नोंद वैराग पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
२२ पानांची सुसाईड नोट सापडली
घटनास्थळी पोलिसांना २२ पानांची सुसाईड नोट आढळून आली आहे. या पत्रात शेअर बाजारातील गुंतवणूक, त्यातून झालेला फायदा आणि नंतर झालेले मोठे नुकसान याबाबत सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे.
योगेश पाटील यांचे वडील हयात नसून, त्यांनी सुसाईड नोटमध्ये आपल्या आईची माफी मागितल्याचेही समोर आले आहे. तसेच नातेवाइकांकडून घेतलेले पैसे परत करू शकलो नाही, याबद्दलची खंतही त्यांनी व्यक्त केली असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
गावात शोककळा; नातेवाइकांचा आक्रोश
घटनेची माहिती मिळताच पाटील कुटुंबीयांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या सामूहिक आत्महत्येमुळे संपूर्ण हत्तीज गावावर शोककळा पसरली असून, नातेवाइकांनी एकच आक्रोश केला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे आर्थिक संकट आणि मानसिक तणावाचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.
