यशश्री अपडेट्स–परंडा | प्रतिनिधी
उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे प्रधानमंत्री मातृत्व सन्मान योजना अंतर्गत आयोजित मासिक आरोग्य शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. गर्भवती माता व भगिनींच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा उपक्रम दर महिन्याच्या ९ तारखेला नियमितपणे राबविण्यात येतो.
कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुबेर मोमीन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी मातृआरोग्य, प्रसूतीपूर्व काळजी तसेच नवजात बालकांच्या आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
संपूर्ण कार्यक्रम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शिबिरात गर्भवती महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक वैद्यकीय चाचण्या, औषधोपचार आणि आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला.
डॉ. देवदत्त कुलकर्णी, डॉ. आनंद मोरे, डॉ. हाश्मी, डॉ. आकाश जाधवर व डॉ. बोराडे यांनी गर्भवती मातांच्या नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व, सोनोग्राफी, रक्त तपासणी, पोषणयुक्त आहार, लसीकरण तसेच प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी डॉ. जुबेर मोमीन, डॉ. देवदत्त कुलकर्णी, डॉ. आनंद मोरे आणि वरिष्ठ परिचारिका थिटे सिस्टर यांनी संयुक्तपणे प्रधानमंत्री मातृत्व सन्मान योजनेची जनजागृती केली. योजनेची उद्दिष्टे, लाभ, तपासण्यांचे वेळापत्रक आणि माता-बाल आरोग्य सुधारण्यासाठी शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थित लाभार्थींना देण्यात आली.
“निरोगी माता, निरोगी बालक – सुरक्षित मातृत्व, सुदृढ देश” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
