डिजिटल शिधापत्रिका प्रणाली लागू; अर्ज, नाव समावेश, दुय्यम प्रत आणि विविध सेवा आता पूर्णपणे ऑनलाइन उपलब्ध
यशश्री अपडेट्स | धाराशिव प्रतिनिधी
राज्य शासनाने नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत पारंपरिक पुस्तकी शिधापत्रिका प्रणालीला निरोप देऊन डिजिटल ऑनलाइन शिधापत्रिका प्रणाली लागू केली आहे. १६ मे २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार केशरी, पिवळी आणि शुभ्र शिधापत्रिका आता ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करण्यात आल्या असून नागरिकांनी सर्व सेवा अधिकृत माध्यमातूनच घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सध्या AAY, PHH, APL Farmer, NPH आणि APL White या प्रकारातील शिधापत्रिका उपलब्ध आहेत. पुरवठा विभागाशी संबंधित जवळपास सर्व सेवा ऑनलाइन करण्यात आल्या असून शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नवीन सदस्याचा समावेश करणे, नवीन शिधापत्रिका मिळविणे, दुय्यम प्रत काढणे यासह विविध सेवा नागरिकांना घरबसल्या उपलब्ध होणार आहेत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी अर्ज करताना शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा. स्वतः अर्ज सादर करणाऱ्या नागरिकांना GRAS प्रणालीद्वारे शुल्क भरावे लागणार असून NPH शिधापत्रिकेसाठी ५० रुपये तर APL White शिधापत्रिकेसाठी १०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय विविध शासकीय प्रमाणपत्रे व निराधार योजनांसाठीही शासनाने नियमानुसार शुल्क आकारणी निश्चित केली आहे.
नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे. कोणत्याही एजंट, दलाल किंवा अनधिकृत व्यक्तीकडे वैयक्तिक कागदपत्रे देऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यक असल्यास शासनमान्य सुविधा केंद्रांची मदत घेऊनच प्रक्रिया पूर्ण करावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हे आवाहन नायब तहसीलदार (सामाजिक सहाय्य योजना) एम. जी. शिंदे, नायब तहसीलदार (महसूल-२) तथा पुरवठा निरीक्षण अधिकारी विशाखा बलकवडे आणि तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी केले आहे.
“डिजिटल सेवांचा स्वीकार करा, सुरक्षित राहा आणि दलालमुक्त प्रशासनाला साथ द्या,” असा संदेश प्रशासनाने नागरिकांना दिला आहे.

