मराठा सेवक समितीचे आवाहन : अर्ज क्रमांकाशिवाय हेल्पलाइनवर संपर्क टाळा
यशश्री अपडेट्स-प्रतिनिधी :
मुंबई, दि. ४ जून : मराठा आरक्षण उपसमितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 9326562815 या हेल्पलाइन क्रमांकावर पहिल्याच दिवशी हजारो कॉल प्राप्त झाले. मात्र त्यापैकी बहुतांश कॉल माहिती विचारणारे किंवा अर्ज न करता केलेले असल्याने खऱ्या तक्रारदारांना संपर्क साधण्यात अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे हेल्पलाइनवरील ताण वाढला असून आवश्यक मदत मिळण्यास विलंब होत आहे.
मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनानंतर शासनाने २ जून २०२६ रोजी मंत्रालयात विशेष कक्ष आणि हेल्पलाइन सुरू केली. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले होते.
सातारा गॅझेटबाबत अनावश्यक चौकशी
हेल्पलाइन सुरू होताच पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांकडून सातारा गॅझेट संदर्भात मोठ्या प्रमाणावर चौकशी करण्यात आली. मात्र या विषयावर अद्याप कोणताही शासन निर्णय (GR) अथवा कार्यपद्धती (SOP) जारी झालेली नसल्याने संबंधित प्रश्नांना ठोस उत्तर देणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.
तसेच हैदराबाद गॅझेट संदर्भातील प्रक्रिया नुकतीच सुरू झाल्याने “माझी नोंद सापडते का?”, “मला दाखला मिळेल का?” अशा प्रकारच्या चौकशींनीही हेल्पलाइन व्यस्त राहिली. अशा बाबींसाठी नागरिकांनी प्रथम आपल्या जवळच्या ई-सेवा केंद्रात अथवा संबंधित कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेल्पलाइनचा उद्देश काय?
उपसमितीच्या माहितीनुसार ही हेल्पलाइन माहिती देण्यासाठी नसून तक्रार निवारणासाठी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे खालील बाबींमध्येच हेल्पलाइनचा वापर करावा.
फक्त या चार कारणांसाठीच संपर्क करा
👉 अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी – कुणबी जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणीसाठी अर्ज केलेला असल्यास अर्ज क्रमांकासह चौकशी करा.
👉 अर्ज नाकारला असल्यास – तलाठी, सेतू केंद्र किंवा संबंधित कार्यालयाने अर्ज फेटाळल्यास नकाराचे कारण जाणून घेण्यासाठी संपर्क साधा.
👉 तक्रारीवर कार्यवाही न झाल्यास – तक्रार नोंदवून सात दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही जिल्हाधिकारी कार्यालयातून संपर्क झाला नसेल तर तक्रार करा.
👉 विशेष शिबिरांची माहिती घेण्यासाठी – आपल्या तालुक्यात कुणबी दाखले वाटप शिबिर कधी आयोजित करण्यात येणार आहे, याबाबत माहिती मिळवता येईल.
या कारणांसाठी कॉल करू नका
❌ अर्जच दाखल केलेला नसेल.
❌ सातारा गॅझेटबाबत माहिती विचारायची असेल.
❌ “आरक्षण द्या”, “न्याय द्या” अशा भावनिक स्वरूपाच्या मागण्या मांडायच्या असतील.
तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया
- हेल्पलाइनवर संपर्क साधून नाव, गाव, तालुका व अर्ज क्रमांक द्यावा.
- तक्रार मंत्रालय स्तरावर नोंदवली जाईल.
- संबंधित प्रकरण जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयाकडे पाठवले जाईल.
- सात दिवसांच्या आत नागरिकांशी संपर्क साधून माहिती व मार्गदर्शन केले जाईल.
एकाच क्रमांकावरून वारंवार कॉल करू नका
मराठा सेवक समितीने नागरिकांना आवाहन केले आहे की, एकाच क्रमांकावरून दिवसातून अनेक वेळा कॉल केल्याने हेल्पलाइनची लाईन व्यस्त राहते. त्यामुळे प्रत्यक्ष मदतीची गरज असलेल्या नागरिकांपर्यंत सेवा पोहोचण्यात अडथळे निर्माण होतात. एकदा तक्रार किंवा संदेश नोंदवल्यानंतर किमान सात दिवस प्रतीक्षा करावी.
जिल्हास्तरावर स्वतंत्र हेल्पलाइनचा प्रस्ताव
पुढील १५ दिवसांत राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे मंत्रालयावरील ताण कमी होऊन नागरिकांना स्थानिक पातळीवर जलद मदत उपलब्ध होईल.
थोडक्यात…
प्रथम सेतू केंद्र, तहसील कार्यालय किंवा संबंधित यंत्रणेकडे अर्ज करा. त्यानंतर अर्ज क्रमांक, टोकन किंवा पोचपावतीसह येणाऱ्या अडचणींबाबत 9326562815 या हेल्पलाइनवर संपर्क साधा. खऱ्या गरजूंपर्यंत मदत पोहोचण्यासाठी हेल्पलाइनचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन मराठा सेवक समितीने केले आहे.
