महागाई, बेरोजगारी आणि मतदार यादीतील गोंधळाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे परंड्यात आंदोलनात्मक निवेदन

यशश्री अपडेट्स-परंडा (प्रतिनिधी) :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या तालुकानिहाय जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज परंडा तहसील कार्यालयात विविध लोकहिताच्या प्रश्नांसंदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनाद्वारे वाढती महागाई, बेरोजगारी, डिझेलच्या दरातील वाढ, पेपरफुटीच्या घटना तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) आणि मतदार यादीतील त्रुटी यांसारख्या गंभीर विषयांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची तातडीने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी बोलताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर महागाईचा वाढता परिणाम होत असून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करून प्रत्येक पात्र मतदाराचे नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष किरण कराळे, जिल्हा सचिव सुवास ठोंगे, शहराध्यक्ष शहाबर्फीवाले, युवक तालुका अध्यक्ष प्रवीण गरड, शिवाजी गायकवाड, जिल्हा संघटक अमोल सुरवसे, दशरथ चाबुकसवर, सज्जन गोडगे, तालुकाध्यक्ष कुंभार, माजी सैनिक हनुमंत चव्हाण, अब्दुल पटेल, कल्याणराव थिटे, मारुती कांबळे, दादासाहेब केमदारने, महावीर महाराज, ऋषिकेश पाटील, अनिल नाईकवाडी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून न्याय द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *