यशश्री अपडेट्स- परंडा | प्रतिनिधी
सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांत दडलेला इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा केवळ पुस्तकांमध्ये वाचण्यासाठी नसून तो जपण्यासाठी आणि जगण्यासाठी असतो, याची प्रचिती रविवारी परंडा शहराने अनुभवली. राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीने आयोजित गड-किल्ले स्वच्छता मोहिमेअंतर्गत मुख्य मोहीम क्रमांक 21 परंडा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर उत्साहात पार पडली. या मोहिमेसाठी महाराष्ट्रातील तब्बल 26 जिल्ह्यांमधून सुमारे 600 ते 700 गडप्रेमी युवक-युवती परंड्यात दाखल झाले होते.
इतिहास संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या या तरुणांनी पहाटेपासूनच किल्ल्याच्या स्वच्छता व संवर्धन कार्याला सुरुवात केली. किल्ल्याची विशालता आणि परिसर लक्षात घेऊन स्वयंसेवकांचे 15 स्वतंत्र गट तयार करण्यात आले होते. प्रत्येक गटाला तटबंदी व विशिष्ट भागाची जबाबदारी देण्यात आली होती. दिवसभराच्या अथक परिश्रमातून किल्ल्यावरील अनावश्यक झाडे, झुडपे, गवत तसेच प्लास्टिक व इतर कचरा हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.
15 तटबंदी, 15 गट आणि संवर्धनाचा नवा आदर्श
परंडा भुईकोट किल्ल्याच्या ऐतिहासिक भिंतींना व वास्तूंना हानी पोहोचवणारी झाडे-झुडपे मुळासकट काढण्यात आली. अनेक वर्षांपासून साचलेला कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. विशेष म्हणजे, स्वच्छता करताना ऐतिहासिक बांधकामाला कोणतीही हानी पोहोचू नये याची विशेष काळजी घेण्यात आली. त्यामुळे ही मोहीम केवळ स्वच्छता मोहीम न राहता संवर्धन मोहिमेचे आदर्श उदाहरण ठरली.
इतिहासाच्या रक्षणासाठी महाराष्ट्रभरातील मावळे एकत्र
राजा शिवछत्रपती परिवाराच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राच्या विविध भागांतील तरुण मोठ्या संख्येने परंड्यात दाखल झाले होते. इतिहास, गड-किल्ले आणि शिवकालीन वारसा जपण्याची भावना मनात ठेवून त्यांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. किल्ल्याच्या प्रत्येक भागात युवक-युवतींनी श्रमदान करून इतिहास संवर्धनाचा संदेश दिला.
या मोहिमेसाठी सहभागी झालेले शेकडो मावळे दि. 30 मे रोजी सायंकाळीच परंड्यात दाखल झाले होते. त्यांच्या निवास व भोजनाची संपूर्ण व्यवस्था परंड्यातील राजवीरा मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा धीरजसिंह ठाकूर यांनी आपल्या कार्यालयात केली. दोन दिवसांच्या या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवकांसाठी त्यांनी दिलेले सहकार्य उल्लेखनीय ठरले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल परंडा तालुका मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

राजा शिवछत्रपती परिवाराची राज्यव्यापी चळवळ
राजा शिवछत्रपती परिवार ही महाराष्ट्रातील गड-किल्ले संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेली अग्रगण्य संस्था आहे. संस्थेमार्फत राज्यभर मुख्य मोहीम, संयुक्त मोहीम आणि विभागीय मोहीम अशा तीन स्वरूपांत उपक्रम राबविले जातात. मुख्य मोहीम दोन दिवसांची असते. पहिल्या दिवशी देवदर्शन आणि परिचय कार्यक्रम तर दुसऱ्या दिवशी गड-किल्ले स्वच्छता व संवर्धनाचे कार्य केले जाते. संयुक्त मोहिमेत दोन किंवा अधिक विभाग एकत्र येऊन काम करतात, तर विभागीय मोहीम एकदिवसीय असते.
गड संवर्धनासोबत सामाजिक परिवर्तनाची चळवळ
राजा शिवछत्रपती परिवाराचे कार्य केवळ गड-किल्ल्यांपुरते मर्यादित नाही. व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, रोजगार मार्गदर्शन, गरजूंना मदत, महिला सक्षमीकरण आणि ऐतिहासिक वारशाबाबत जनजागृती असे विविध सामाजिक उपक्रमही संस्था राबविते. “केवळ गड स्वच्छ करणे नाही, तर तरुणांच्या मनातील नकारात्मकता दूर करून समाजाभिमुख विचार निर्माण करणे हेच आमचे खरे ध्येय आहे,” असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.
परंडा भुईकोट किल्ल्यावर झालेल्या या भव्य मोहिमेमुळे ऐतिहासिक वास्तूने नवसंजीवनी घेतली असून महाराष्ट्रातील तरुणाई इतिहास संवर्धनासाठी किती कटिबद्ध आहे, याचे प्रभावी दर्शन घडले. गड-किल्ल्यांच्या जतनासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी अशा मोहिमा भविष्यातही प्रेरणादायी ठरणार आहेत.

