यशश्री अपडेट्स-धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांसमोर आता अपक्ष उमेदवाराचेही आव्हान उभे राहिले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे धाराशिव नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक सचिन उर्फ राजाभाऊ पवार यांनी सोमवारी (दि. १ जून) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीत उडी घेतली.
या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून महेश देशमुख तर महायुतीकडून माजी मंत्री बसवराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही प्रमुख आघाड्यांचे उमेदवार मैदानात असतानाच राजाभाऊ पवार यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धाराशिव, बीड आणि लातूर या तीन जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेले प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक मताला मोठे महत्त्व असून उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क वाढविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत उबाठा गटाशी संबंधित असलेले राजाभाऊ पवार यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने मतविभाजनाचा परिणाम काय होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना राजाभाऊ पवार यांच्यासोबत नगरसेवक नाना घाटगे, अमित उंबरे, राज निकम, ज्ञानदेव करवर यांच्यासह मोठ्या संख्येने समर्थक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. समर्थकांच्या घोषणाबाजीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, महाविकास आघाडीचे महेश देशमुख, महायुतीचे बसवराज पाटील आणि अपक्ष उमेदवार सचिन उर्फ राजाभाऊ पवार या तिरंगी लढतीमुळे धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक अधिक चुरशीची आणि रंगतदार होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. आगामी काळात उमेदवारांच्या प्रचाराची रणनीती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांचा कल यावर या निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे.
महायुती-मविआसमोर सचिन उर्फ राजाभाऊ पवारांचे अपक्ष आव्हान; विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढली
