जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते पाद्यपूजा; मंदिर संस्थानच्या वतीने शाल, महावस्त्र व देवीची प्रतिमा देऊन सन्मान
यशश्री अपडेट्स | तुळजापूर
नाशिक येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्मध्वज स्थापना सोहळ्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले श्रृंगेरी शारदा पीठाचे परमपूज्य जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांनी बुधवारी श्रीक्षेत्र तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीची विधिवत आरती करून मातेशी प्रार्थना केली. जगद्गुरू शंकराचार्यांच्या आगमनामुळे तुळजापूरच्या धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात भक्तिमय उत्साह निर्माण झाला होता.
शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांच्या आगमनप्रसंगी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शंकराचार्यांची विधिवत पाद्यपूजा करण्यात आली. त्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने देवीची प्रतिमा, कवड्याची माळ, शाल आणि महावस्त्र भेट देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यानंतर जगद्गुरू शंकराचार्यांनी श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरू असलेल्या जीर्णोद्धार आणि विविध विकासकामांची पाहणी केली. मंदिराचे धार्मिक महत्त्व, ऐतिहासिक वारसा आणि वास्तुशिल्प जतन करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली. त्यांच्या या भेटीमुळे मंदिराच्या आध्यात्मिक महत्त्वासोबतच धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले.

श्रृंगेरी शारदा पीठ हे आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार प्रमुख पीठांपैकी पहिले दक्षिणाम्नाय पीठ म्हणून ओळखले जाते. भारतीय सनातन परंपरा, वेदांत तत्त्वज्ञान आणि धार्मिक संस्कृतीच्या जतनामध्ये या पीठाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. अशा प्रतिष्ठित पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतल्याने तुळजापूरच्या धार्मिक वैभवात आणखी एक मंगलमय क्षणाची भर पडली.
या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर, नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालक जया वाहणे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, सहायक व्यवस्थापक जयसिंग पाटील, नागेश शितोळे, अनुप ढमाले, रामेश्वर वाले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, सरकारी उपाध्ये बंडोपंत पाठक, नागेशशास्त्री अंबुलगे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, विपिन शिंदे, अनंत कोंडो यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, पुजारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

जगद्गुरू शंकराचार्यांच्या पवित्र उपस्थितीमुळे श्रीक्षेत्र तुळजापूरच्या धार्मिक वातावरणात विशेष चैतन्य निर्माण झाले. त्यांच्या दर्शनाने आणि शुभाशीर्वादाने भाविकांसह मंदिर संस्थानच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. आई तुळजाभवानीच्या पावन चरणी नतमस्तक झालेल्या या धार्मिक भेटीमुळे तुळजापूरच्या आध्यात्मिक परंपरेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
